डॉक्‍टरांच्या संपामुळे सेवा विस्कळित

रत्नागिरी - पत्रकार परिषदेत बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे. शेजारी सौ. पौर्णिमा मुकादम, डॉ. रमेश चव्हाण, डॉ. रवींद्र गोंधळेकर.
रत्नागिरी - पत्रकार परिषदेत बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे. शेजारी सौ. पौर्णिमा मुकादम, डॉ. रमेश चव्हाण, डॉ. रवींद्र गोंधळेकर.

रत्नागिरी - धुळे येथे डॉ. रोहन म्हामुणकर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाइकांनी केलेल्या अमानुष हल्ल्याविरोधात आज जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्‍टरनी संप पुकारला. यामुळे रुग्णसेवा विस्कळित झाली. डॉक्‍टर हे रुग्णांना बरे करण्यासाठी दर्जेदार सेवा देण्याकरिता अहोरात्र झटत असतात; पण अशा हल्ल्याने आरोग्य सेवेवरच परिणाम होऊ शकतो. डॉक्‍टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांनी संयम बाळगून आचरण ठेवावे, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

धुळ्यामध्ये डॉ. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. म्हामुणकर यांच्यावर हल्ला झाल्याने ते जखमी आहेत. या हल्ल्याचा निषेध आयएमएने आज केला आणि बंद पाळला. जिल्ह्यातील आयएमएशी संलग्न सर्व खासगी रुग्णालये आणि आपत्कालीन यंत्रणा बंद केली. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले.

पत्रकार परिषदेत अध्यक्ष डॉ. शिंदे यांनी सांगितले की, डॉक्‍टरांवर असे हल्ले होणे हे गंभीर आहे. यातील दोषींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. सर्व सरकारी व खासगी दवाखान्यात २४ तास पोलिस बंदोबस्त ठेवणे आवश्‍यक आहे. डॉक्‍टर व रुग्णसंबंधावर जनजागृतीचे काम आयएमए करीत आहे. हल्ल्यांविरोधी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्‍यक आहे. रत्नागिरीत अशा प्रकारांचे हल्ल्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. पत्रकार परिषदेला डॉ. मुकादम, डॉ. रमेश चव्हाण, डॉ. सुनील गोगटे, डॉ. रवींद्र गोंधळेकर यांच्यासह रत्नागिरीतील आयएमएचे सदस्य डॉक्‍टर्स उपस्थित होते.

म्हैसाळ येथील घटनेचा निषेध...
म्हैसाळ (सांगली) येथे झालेल्या गर्भपाताच्या घटनेचा निषेध इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेने केला. यासंदर्भात आज जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देण्यात आले. रेडिओलॉजिस्ट असोसिएशन, रत्नागिरी गायनॅक असोसिएशननेही या घटनेचे तीव्र निषेध केला असून हा प्रकार निंदनीय असल्याचे म्हटले आहे.अशा गोष्टींसाठी समर्थन करणार नाही, असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे यांनी सांगितले. उपाध्यक्ष डॉ. पराग पाथरे, डॉ. परकार, सचिव डॉ. पौर्णिमा मुकादम, कोषाध्यक्ष डॉ. अतुल ढगे, डॉ. गिरीश करमरकर, डॉ. सुमेधा करमरकर, डॉ. विवेक पोतदार, डॉ. रश्‍मी आठल्ये, डॉ. निनाद नाफडे, डॉ. तोरल शिंदे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com