तेरवण मेढेचा डोंगर पुन्हा समृद्ध करायचाय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जून 2016

दोडामार्ग :  दोडामार्ग कन्झर्वेशन संस्थेमार्फत तेरवण मेढेतील पन्नास एकर डोंगर परिसरात विविध वृक्षांची व फळझाडांची लागवड करण्यात येत आहे. वन्यप्राणी, पशुपक्षी यांना निवारा व अन्न मिळावे आणि ते वस्तीत घुसत असल्याने वन्यजीव व मानव यांच्यातील सतत अनुभवास येणारा संघर्ष संपावा या उद्देशाने ती लागवड केली जात आहे. संस्थेचे संस्थापक संचालक महेश म्हांबोरे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मानवाकडून निसर्गावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे निसर्गसंपदा ऱ्हास पावत आहे. वेगवेगळ्या वनस्पती, वनौषधी, विविध फळझाडे, अनेकविध वृक्षवल्ली दिवसेंदिवस नष्ट होत आहेत. वन आणि वनसंपदेवरील मानवी अतिक्रमणामुळे वन्यजीवांचा आधारच नाहीसा होत आहे. त्यांचा निवारा, त्यांचे खाद्य हरवत चालल्याने त्यांना त्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे कूच करावी लागत आहे. त्यामुळे वन्यजीवांना पुन्हा निवारा आणि खाद्य मिळेल अशी स्थिती निर्माण करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन श्री. म्हांबोरे यांनी डोंगरभागातील पन्नास एकर क्षेत्रात वेगवेगळी फळझाडे, बांबू, कोकम व अन्य झाडे लावण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 14) वृक्षारोपणाचा प्रारंभही झाला.

तेरवणमेढेच्या सरपंच प्रज्ञा प्रदीप नाईक, ग्रामपंचायत सदस्य नमिता गवस, ग्रामस्थ नारायण गवस, सुभाष कांबळे, सोमा गवस आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी आसपासच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही बोलावण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वनसंपदा, वन्यजीव यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम निर्माण व्हावे आणि वन्यजीव व वनसंपदा रक्षणासाठी त्यांनीही सहभागी व्हावे, यासाठी त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण झाले.

लागवड केलेल्या वृक्षांची जीपीआरएस प्रणालीद्वारे नोंद ठेवण्यात येणार आहे. त्याची सुरवातही कालपासूनच झाली.

त्यांनी धडा घ्यावा
उजाड डोंगर हिरवेकंच व निसर्गसमृद्ध करायचे, पर्यावरणाचे जतन व संवर्धन करायचे या उद्देशाने तेरवणमेढेत उपक्रम राबविला जात आहे. इमारती आणि जळणासाठी वृक्षांच्या कत्तली करून डोंगर बोडके करणाऱ्या लाकूड व्यावसायिकांनी आणि त्यांना सढळ हस्ते वृक्षतोड परवाने देणाऱ्या वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यातून धडा घेण्याची गरज आहे.