वीजेच्या मागणीत वाढ; मात्र उपलब्धता कमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

विजेच्या मागणीत झालेली मोठी वाढ व उपलब्धतेत झालेली घट यामुळे राज्यात गुरूवारी (ता. 4) महावितरणकडून सुमारे 1,500 मेगावॅटच्या आवश्‍यकतेनुसार तात्पुरते भारनियमन करण्यात आले होते.

कुडाळ - विजेच्या मागणीत झालेली मोठी वाढ व उपलब्धतेत झालेली घट यामुळे राज्यात गुरूवारी (ता. 4) महावितरणकडून सुमारे 1,500 मेगावॅटच्या आवश्‍यकतेनुसार तात्पुरते भारनियमन करण्यात आले होते. महावितरणकडून वीज उपलब्धता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. महानिर्मिती व अदानी यांच्या वीज निर्मिती संचापासून वीज उपलब्धतेमध्ये सुमारे 700 मेगावॅट इतकी वाढ झालेली आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी विजेच्या मागणीमध्ये सर्वसाधारण 2000 मेगावॅटने वाढ झालेली असून सद्यस्थितीत महावितरणची विजेची मागणी 18000 ते 18500 मेगावॅट एवढी आहे. विजेची गरज भागविण्यासाठी महानिर्मिती, केंद्राकडून मिळणारा वाटा, खाजगी वीज उत्पादक तसेच विविध स्त्रोतांकडून महावितरण वीज खरेदी करीत आहे. परंतु महानिर्मितीच्या संचापैकी कोराडी संच क्रमांक 10, खापरखेडा संच क्रमांक 2, परळी संच क्रमांक 8 तसेच अदानी संच क्रमांक 1, रतन इंडियाचे संच क्रमांक 4 व 5 हे तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. अदानी आणि रतन इंडिया यांच्या चालू असलेल्या संचामधून कमी वीजनिर्मिती होत आहे. यामुळे अंदाजे 3000 मेगावॅटपर्यंत विजेची उपलब्धता कमी झालेली आहे.

याशिवाय देखभाल दुरुस्तीसाठी चंद्रपूर संच क्रमांक 7, कोराडी संच क्रमांक 6, केंद्राकडून मिळणारा सिपत संच क्रमांक 1 व तारापूर संच क्रमांक 4, नियोजितरित्या अगोदरच बंद केलेले असल्यामुळे विजेची उपलब्धता अंदाजे 4000 मेगावॅटने कमी झाली आहे. एवढी उपलब्धता कमी होऊनही 3 व 4 मेस महावितरणकडून 1000 ते 1200 मेगावॅट इतकेच भारनियमन करण्यात आले आहे. अकृषक ग्राहकांना 400 ते 600 मेगावॅट एवढ्याच भारनियमनाला सामोरे जावे लागले असे या पत्रकात नमूद आहे. अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीत भारनियमन कमीत कमी व्हावे यासाठी महावितरण सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून एक्‍सचेंज, बॅंकिग यांच्या माध्यमातूनही वीज उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महावितरणतर्फे विजेची मागणी व उपलब्धता यांचा मेळ घालून भारनियमन पूर्णपणे बंद करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Election demand is more than availability