सिंधुदुर्ग किल्ल्यावर वीज जोडणीस वेग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मालवण - किल्ले सिंधुदुर्गला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने किल्ले रहिवाशांना समस्या भासत होती. यात किल्ल्याच्या ३४९ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाने वीज समस्या दूर करण्याचे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने महावितरणने युद्धपातळीवर काम करण्यास सुरवात केली आहे. येत्या आठवडाभरात वीजजोडणीचे काम पूर्णत्वास जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

मालवण - किल्ले सिंधुदुर्गला वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने किल्ले रहिवाशांना समस्या भासत होती. यात किल्ल्याच्या ३४९ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने राज्य शासनाने वीज समस्या दूर करण्याचे आश्‍वासन दिले होते. या आश्‍वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने महावितरणने युद्धपातळीवर काम करण्यास सुरवात केली आहे. येत्या आठवडाभरात वीजजोडणीचे काम पूर्णत्वास जाईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

किल्ले सिंधुदुर्गला दांडी किनाऱ्यावरून वीजपुरवठा केला जातो; मात्र गेली कित्येक वर्षे वीज खांबांची डागडुजी न झाल्याने खांब तसेच वीजवाहिन्या जीर्ण झाल्या होत्या. यावर किल्ले रहिवासी संघ तसेच किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या पाठपुराव्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे लक्ष वेधले. त्यानुसार किल्ल्याला वीजपुरवठा करणारे खांब व वाहिन्या बदलण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. किल्ले सिंधुदुर्गचा एप्रिल महिन्यात ऐतिहासिक ३५० वा वर्धापन दिन सोहळा होणार आहे. या सोहळ्यापूर्वी वीज जोडणीचे काम पूर्ण केले जाणार आहे. एप्रिल २०१६ मध्ये किल्ल्यावर विद्युत मनोरे उभारण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. निविदा प्रक्रिया न झाल्याने हे काम रखडले; मात्र किल्लेवासीयांची तसेच पर्यटकांची विजेविना गैरसोय होऊ नये यासाठी फोर पोल स्ट्रक्‍चरचे दोन खांब उभारण्यात आले आहेत. शिवाय या वीजमार्गावर ८ विद्युत खांब उभारण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. विद्युत मनोऱ्याचे कामही प्रस्तावित असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. 

विद्युत मनोऱ्याचे काम प्रस्तावित असल्याने शासनाच्या आदेशाने वीज खांब उभारून नव्या वीजवाहिन्या जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. समुद्राचा भाग असल्याने भरतीच्या वेळी काम बंद ठेवले जाते. त्यामुळे वीज जोडणीस विलंब होत आहे; मात्र खासगी कंपनीच्या दोन निरीक्षकांसह १५ कर्मचारी काम करत आहेत. डीपी तसेच विद्युत रोहित्र बसविण्यात आले असून सिंधुदुर्ग किल्ल्यास आता ११ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा होणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. किल्ल्यात १२ वीज खांब आहेत; मात्र कित्येक वर्षे ते न बदलल्याने खाऱ्या हवामानामुळे ते जीर्ण झाले आहेत. शिवाय वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात किल्लावासीयांना अंधारात राहण्याची वेळ येते. मात्र, यावर्षी पावसाळ्यापूर्वीच वीज खांब व वाहिन्यांची दुरुस्ती होणार आहे. यासाठी गंजलेल्या वीज खांबांचा सर्व्हेही पूर्ण झाला आहे.

आता पावसाळ्यातही वीजपुरवठा
महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, किल्ल्याला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या जीर्ण झाल्याने पावसाळ्यात कोणतीही हानी होऊ नये, यासाठी महावितरणकडून खबरदारीची उपाययोजना म्हणून वीजपुरवठा बंद करण्यात येत होता; मात्र आता नवीन वाहिन्या कार्यान्वित केल्याने वीजपुरवठा बंद होणार नाही. परिणामी, किल्ल्यावरील रहिवाशांना वीजपुरवठ्याची समस्या भासणार नाही. तसेच प्रस्तावित वीज मनोऱ्याचे काम मार्गी लागल्यास वीजपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी दूर होईल.