‘महावितरण’तर्फे एसएमएसची सुविधा

‘महावितरण’तर्फे एसएमएसची सुविधा

माहिती मिळणार घरबसल्या - जिल्‍ह्यात ४२ हजार ४४३ ग्राहकांची नोंदणी पूर्ण
सावंतवाडी - महावितरणने ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी आता ग्राहकांसाठी नवीन एसएमएस सेवा सुरू केली आहे. या सेवेतून बिलासंबंधी सर्व माहिती ग्राहकांना घरबसल्या मोबाइलवर मिळणार आहे.

सद्यःस्थितीत मोबाइल ॲपच्या साहाय्याने नोंदणीचे काम सुरू असून जिल्ह्यातील २ लाख ९८ हजार १५३ ग्राहकांपैकी ४२ हजार ४४३ ग्राहकांची मोबाइल नोंदणी महावितरणकडे झाली आहे.

वीज बिल मिळाले नाही, बिल हरवले आहे, बिल सापडत नाही, मुदत संपल्यावर बिल येते, थकीत राहिले आहे, बिल भरण्याची मुदत समजली नाही, अशा एक ना अनेक समस्या ग्राहक वर्गाला सतावत असतात.

ग्राहकांच्या अशा अनेक समस्यांवर आता महावितरणने एसएमएसद्वारे वीज बिलासंबंधी माहिती मिळण्याचा उपाय शोधला आहे. जिल्ह्यात कुडाळ व कणकवली उपविभागीय कार्यालयाअंतर्गत २ लाख ९८ हजार १५३ ग्राहक आहेत. वीज बिलासंबंधी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. 

बिले वेळेत न येणे तसेच ग्राहकांकडून ती वेळेत भरली न जाणे यामुळे अनेकदा दंडात्मक कार्यवाही होते. यात बऱ्याच वेळा वीज कनेक्‍शन तोडले जाते. त्यामुळे ग्राहकवर्ग महावितरणवर नाराज होतो. ही समस्या लक्षात घेऊन आता महावितरणने एसएमएस सेवा सुरू केली आहे. यासाठी मोबाइलवरून आपला महावितरणकडून दिलेला ग्राहक क्रमांक नोंद करून तो महावितरणच्या क्रमांकावर पाठवावा. यानंतर ग्राहकाला आपल्या वीज बिलासंबंधी किंवा समस्येसंबंधी माहिती मोबाइलवर घरबसल्या प्राप्त होणार आहे. यासाठी इंग्लिशमध्ये एमआरजीई टाइप करून स्पेस द्यावा. त्यानंतर वीज बिलावरील आपला १२ अंकी ग्राहक क्रमांक टाइप करावा. नंतर ९२२५५९२२५५ या क्रमांकावर तो पाठवावा. असे केल्यावर ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाची  कायमस्वरुपी नोंदणी होऊन जर काही वीज कनेक्‍शनसंदर्भात समस्या असतील तर त्या एसएमएसने महावितरणकडून कळविण्यात येतात. 

कुडाळ उपविभागाअंतर्गत वेंगुर्लेमध्ये ३३ हजार ४१२ ग्राहकांपैकी ३ हजार ५१३ ग्राहकांची नोंद झाली. कुडाळ ४० हजार ९२ पैकी ४५६०, १४ हजार ६१९ पैकी १ हजार ४८६, सावंतवाडी ४१ हजार ९३२ पैकी ६७३८, ओरोस १७ हजार २८३ पैकी २ हजार ३७७ असे मिळून एकूण १ लाख ४७ हजार ३३८ पैकी १८ हजार ७३४ मोबाइल क्रमांकांची नोंद झाली आहे. तर कणकवली उपविभागामध्ये मालवण २८ हजार ५३१ पैकी ६७०५, कणकवली ४१ हजार ७६५ पैकी ५ हजार ९४८, वैभववाडी २३ हजार २९५ पैकी २५२६, आचरा २३ हजार ११७ पैकी २४२० आणि देवगड ३४ हजार १०७ पैकी ६११० असे एकूण १ लाख ५० हजार ८१५ पैकी २३ हजार ७०९ मोबाइल ग्राहकांची नोंदणी झाली. 
एसएमएस प्रणालीप्रमाणे ई-मेलद्वारेही माहिती मिळण्याची सुविधा सुरू झाली आहे. इंग्लिशमध्ये एमआरजीई स्पेस सोडून १२ अंकी ग्राहक क्रमांक स्पेस देऊन ई-मेल टाईप करून तो ९२२५५९२२५५ यावर पाठवावा. थकीत वीज बिलाची माहिती, ते भरण्यासाठीही अलर्ट करण्यात येणार आहे.

नियोजनास सोयीस्कर
तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी खंडित केलेला वीजपुरवठा किती काळ खंडित राहणार आहे व तो केव्हा पूर्ववत चालू राहणार आहे याची माहिती महावितरणकडून देण्यात येणार आहे. यामुळे या काळात कामांचे नियोजन किंवा त्यावर पर्यायी व्यवस्था करता येणार आहे. सध्या जिल्ह्यात ४२ हजार ४३४ ग्राहकांची मोबाइल नोंदणी झाली आहे.

ॲप कार्यान्वित
महावितरण कंपनीने मोबाइलसाठी महावितरण ॲप सुरू केले आहे. यात नवीन वीज कनेक्‍शन नोंदणी, घर बंद असल्यास मीटर रीडिंग पाठविण्याची सुविधा, वीज बिलाचा तपशील, वीज बिल भरण्याची सुविधा, तक्रारी, मोबाइल क्रमांक नोंद करणे, सेवांबद्दलची पार्श्‍वभूमी, त्याची माहिती आदी प्रकारच्या सेवा या ॲपवर देण्यात येतात. हे ॲप प्लेस्टोअरमधून डाउनलोड करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com