अभियंता पदाची नोकरी सोडून करंजाळीत पिकवला काळा तांदूळ

वडिलोपार्जित शेतीचा अभिषेक सुर्वेंचा निर्णय; कोकणात भातशेतीला नवा आर्थिक आयाम
Engineer left his job Black Rice crop  Karanjali konkan dabhol
Engineer left his job Black Rice crop Karanjali konkan dabholsakal

दाभोळ : मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरी करणाऱ्या तरूणाने नोकरीचा राजीनामा देऊन शेतीची कास धरली आहे. दापोली तालुक्यातील करंजाळी गावी येऊन त्याने काळ्या तांदळाची शेती सुरू केली आहे. अभिषेक सुर्वे असे त्याचे नाव आहे. जगात सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या आणि खाण्यासाठी अत्यंत रुचकर असलेल्या काळ्या तांदळाची शेती तो करतो. या तांदळाला औषध कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. या तांदळामुळे कोकणातील भातशेतीचे अर्थकारण बदलून कोकणातील भातशेतीला एक नवा आर्थिक आयाम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिषेक हा करंजाळी येथील मूळ रहिवासी असला तरी तो मुंबई येथे अभियंता म्हणून नोकरीला होता; मात्र आता तो आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन दापोलीत आला आहे. अभिषेकने दापोलीत स्थायिक झाल्यावर आपली वडिलोपार्जित असणारी शेती करण्याचा निर्णय घेतला व आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करायला सुरवात केली. अभिषेक हा मुंबईतील एका धान्य उत्पादन व वितरण व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी आहे. यामध्ये त्याला काळ्या तांदळाची माहिती मिळाली.

लॉकडाउनच्या काळात त्याने पत्रव्यवहार करून काळ्या तांदळाच्या बियाणे पुरवठादार व्यक्तीशी संपर्क साधला. त्यांनी साडेतीनशे रुपये किलो दराने काळ्या तांदळाचे बियाणे अभिषेकला कुरिअरद्वारे पाठवले; परंतु लॉकडाउन असल्यामुळे अभिषेकला हे बियाणे मिळायला तीन महिन्यांचा अवधी लागला. यामुळे यातील अर्धेअधिक बियाणे खराब झाले. उरलेले बियाणे अभिषेकने लावले. आज अभिषेकची काळ्या तांदळाची शेती बहरली आहे.

काळ्या तांदळाला मोठ्या शहरात तसेच परदेशात मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांमध्ये चांगल्या दराने विकला जातो. ऑनलाइन साईटवर या तांदळाची विक्री ३९९ रुपये प्रतिकिलो दराने सुरू आहे, असे अभिषेकने सांगितले. कोकणात उकडीचे तांदूळ, गावठी तांदूळ, बासमती, सुवर्णा, कोलम अशा अनेक प्रकारच्या भातांची शेती केली जाते.

आता अभिषेकसारख्या प्रयोगशील शेतकऱ्याने काळ्या तांदळाची शेती करायला सुरवात केली आहे. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ (ब्लॅक राईस) हा शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फारच फायदेशीर आहे. कार्बोहायड्रेटयुक्त असलेला हा तांदूळ शरीरातील साखर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे, असे अनेकांचा दावा आहे.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण राहते नियंत्रणात

हा तांदूळ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात येते. या तांदळात मोठ्या प्रमाणात फायबर आहे. सोबतच अँटीऑक्सिडेंट तत्त्व असल्याने हा तांदूळ डोळ्यांसाठीदेखील उपयुक्त आहे. त्यामुळे भारतातच नव्हे तर विदेशातूनदेखील या तांदळाला मोठी मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com