प्रवेश परीक्षांसाठी वेळेचे नियोजन हवे - डी. के. देशमुख

कणकवली - ‘लक्षवेध’च्या कार्यशाळेत बोलताना सतीश सावंत.
कणकवली - ‘लक्षवेध’च्या कार्यशाळेत बोलताना सतीश सावंत.

कणकवली - वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेमध्ये करिअर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा अनिवार्य झाल्या आहेत. या परीक्षांना सामोरे जाताना सातत्याने  सराव करून वेळेचे नियोजन केले, गोंधळून न जाता चुका कमी केल्या तर यश निश्‍चित मिळते, असे मत राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूरचे तज्ज्ञ डी. के. देशमुख यांनी येथे व्यक्त केले. 

एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जिल्हा बॅंकेतर्फे ‘लक्षवेध’ ही प्रवेश प्रक्रिया कार्यशाळा झाली. याचे उद्‌घाटन आणि तज्ज्ञांचे स्वागत बॅंकेचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. या वेळी प्राचार्य डॉ. ए. के. भट, रजिस्ट्रार सागर सईकर, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील दहावी तसेच अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी तसेच पालक कार्यशाळेला उपस्थित होते. 

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘प्रवेश परीक्षा पद्धत प्रथम समजून घ्या. आपल्याला कोणत्या शाखेत जायचे आहे हे निश्‍चित करून त्या त्या शाखांच्या महाविद्यालयाची माहिती घ्या आणि सीईटी किंवा नीट द्यायची याची माहिती करून घ्या. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाया मजबूत करावा लागतो. त्याची तयारी करण्यासाठी केवळ घोकंपट्टी चालणार नाही. अर्थपूर्ण वाचन असले पाहिजे. आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी जीव ओतावा लागतो. यासाठी स्वयंनिर्देशित अभ्यास करण्याची गरज असली पाहिजे. अभ्यासातून आनंद मिळायला पाहिजे. मी चांगली व्यक्ती बनणार असे ध्येय असावे लागते.’’

प्रा. विनोद झरीटाकेकर यांनी वैद्यकीय शाखेच्या प्रवेशाच्या नीटविषयी माहिती देताना स्पष्ट केले, की केंद्र शासनाने देशभरात वैद्यकीय प्रवेशाची नीट परीक्षा लागू केली आहे. यंदापासून ती महाराष्ट्रातही घेतली जात आहे. हा अभ्यासक्रम केंद्रीय परीक्षा मंडळाच्या धर्तीवर असतो. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत ८५ टक्के कोटा असून १५ टक्के हा इतर राज्यांतील विद्यार्थ्यांसाठी आहे. 

याचबरोबर मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र अशा तीन विभागांत त्या त्या विभागातील वैद्यकीय महाविद्यालयांत ७० टक्के जागा निश्‍चित असतात. तसेच अपंग, डोंगरी विभाग, स्वातंत्र्यसैनिकांची मुले आणि मुलींसाठी ३ टक्के जागा आरक्षित आहेत. तीन तासांत १८० प्रश्‍नांची उत्तरे देताना प्रथम प्रश्‍न समजून घेतला पाहिजे. उत्तर निवडताना सर्वांगीण विचार करायला हवा. 

प्रा. सतीश पवार यांनी सीईटी, नीट, जेईई मेन आणि ॲडव्हान्स याविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच आयआयटी, एनआयटी, पॅरामेडिकल, इस्रो याविषयी माहिती देऊन गुणांची पद्धत विद्यार्थ्यांसमोर मांडली. या वेळी बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी मार्गदर्शन केले.

‘लातूर पॅटर्न’ हा राजर्षी शाहू महाविद्यालयाने तयार केला. राज्यातील शेकडो विद्यार्थी आमच्याकडे मार्गदर्शनासाठी येत आहेत. याचे कारण आमचे विद्यार्थी अथक परिश्रम घेत आहेत. सिंधुदुर्गातील मुलांनाही यश मिळविणे फार अवघड नाही.
- डी. के. देशमुख, मार्गदर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com