रत्नागिरी : मंडणगड तालुक्यात मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद

सचिन माळी
बुधवार, 19 जुलै 2017

चिंचघर - मांदिवली दरम्यान असणारा हा पूल तीस वर्षांपूर्वीचा असून त्याला दोन्ही बाजूला रेलिंग नसल्याने धोकादायक बनला आहे. भारजा नदीच्या पाणी पातळीचा विचार करता त्याची उंची वाढविणे अत्यावश्यक आहे. पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटून नागरिकांचे हाल होतात. शेतीचे नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत.
- वसीम चिपोळकर  (ग्रामस्थ )

मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यात सतत चार दिवसांपासून दमदार पाऊस सुरु असून यंदाच्या हंगामातील सर्वाधीक पावसाची मंगळवारी नोंद झाली. बुधवार ता.१९ रोजी सकाळी घेतलेल्या मोजणीत तालुक्यात दिवसभरात १६० मिलीमीटर पाऊस पडला. आतापर्यंत तालुक्य़ात एकूण १८४१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या जोरदार पावसामुळे भारजा नदीचे पाणी चिंचघर पुलावरून वाहू लागल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली तसेच पाण्याखाली गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
         
गेल्या तीन दिवसांपासून मंडणगड तालुक्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नद्या, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. भारजा व निवळी नद्यांच्या पुराचे पाणी लगतच्या शेतात घुसल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी नुकसान होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांचे चेहरे चिंतेने ग्रासले आहेत. येणारे पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे मंडणगड दापोली मार्गावरील चिंचघर व मंदिवलीला जोडणाऱ्या पुलावरून भारजा नदीचे पाणी वाहू लागले. मंगळवारी सांयकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहुतक बंद होती. तसेच या पुलाला दोन्ही बाजूला रेलिंग नसल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही बाजूकडील गाड्या चिंचघर व मांदीवली या गावात रात्री थांबवण्यात आल्या होत्या. संपर्क तुटल्याने परिसरातील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल झाले. बुधवारी सकाळी पाणी ओसरल्यानंतर दोन्ही बाजुची वाहतुक पुर्ववत झाली. तालुक्यातील सोवली या गावातील रस्त्याशेजारी असलेली सार्वजनीक नळ पाणी योजनेची विहीर गेल्या तीन दिवसातील पावसामुळे कोसळली आहे. यामुळे १ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसुल विभागाचेवतीने करण्यात आला आहे. सडे येथील भागोजी शंकर धामणे यांच्या घराचे अशंत: नुकसान झाले.