पिता-पुत्रांनी खोदली  ३० फूट खोल विहीर

पिता-पुत्रांनी खोदली  ३० फूट खोल विहीर

चिपळूण - घरालगतच्या दहा गुंठे जमिनीत सातत्याने भातपीक आणि त्यानंतर भाजीपाला घेण्यासाठी पाणी कमी पडते म्हणून पिता व दोन पुत्र यांनी ३० फूट खोल विहीरच खोदली. पित्याचे नाव रवींद्र परशुराम बर्वे, तर मुलांची नावे राहुल आणि राजेश अशी आहेत. रवींद्र यांचे वय सध्या ७२ वर्षे आहे. त्यांच्या जागेतून वर्षभरासाठी उत्पन्न घेताना हे तिघेच तिथे कष्ट करीत असतात, हे वैशिष्ट्य.

चिपळूणनजीकच्या मिरजोळी येथील राहुल व राजेश या दोघांनी स्वयंरोजगाराचाच मार्ग पसंत केला. आपल्या जागेत पिके घेण्यासाठी व घरात पिण्यासाठी तसेच गाई-म्हशी पाळण्यासाठी पुरेसे पाणी नव्हते. यामुळे त्यांनी दहा वर्षांपूर्वी विहीर खोदली. त्यासाठी या तिघांनीच काम केले. १९ फुटांवर पाणी लागले; परंतु त्यानंतर मामला थांबला. विहीर घळून घळून रुंद होत गेली. सर्व बुरूम पडून पडून विहीर भरू लागली. त्यामुळे गेल्यावर्षी त्यांनी विहीर बांधण्याचा निर्णय घेतला. १९ फुटांपासून ३० फुटापर्यंत ते खोल गेले. सारी माती या तिघांनीच काढली. त्यानंतर विहीर बांधली. त्यातील तज्ज्ञांनी मात्र खाली चिरे देणे आणि आवश्‍यक ती कामे यांनीच केली. 

विहीर स्वतः खणण्याचा विचार कसा आला विचारता रवींद्र बर्वे म्हणाले की, पाणी नाही मग विहीर खणून तर पाहू असे म्हणून सुरवात केली. दहा गुंठे जागेत ते तोंडली, कारली, भोपळा, दुधी याचबरोबर केळी, नारळ व फणस यांचे उत्पन्न घेतात. यावर्षी उन्हाच्या तडाख्याने कारल्याचे वेल सुकून गेले; मात्र उर्वरित भाजी चांगली झाली. भाजीला मिरजोळ्यातील आजूबाजूची घरे हे मोठे गिऱ्हाईक आहे. दोन मुलांपैकी एक भाजी घेऊन चिपळुणात घाऊकने देतात. तिघांनी सहा म्हशी पाळल्या आहेत. शेणखतही मिळते. पेंढा व गवत काढण्यासाठी ते आजूबाजूच्या लोकांची जागा भाड्याने घेतात व वरंडी तिघेही स्वतः काढतात. आजूबाजूच्या भागात गुरे कमी झाल्यामुळे गवत काढले जात नाही; मात्र हे स्वतः वरंडी काढून बांधून आणतात. यावर्षी जमीन नांगरण्यासाठी पॉवर टिलरचा उपयोग त्यांनी केला. स्वयंरोजगाराचा एकाच घरातील हा आगळावेगळा फंडा म्हणजे तरुणांपुढे उत्तम अनुकरणीय उदाहरण आहे.

दहा गुंठ्यातच शेती करतो; मात्र सरकारी बियाणी वापरतो. तसेच भाजावळीवर फारसा भर नाही. आम्ही १३ मण भात घेतो. ते घराला वर्षभर पुरते. पेंढा वेगळाच. त्यामुळे शेती परवडत नाही असे होत नाही. आम्ही स्वतःच काम करीत असल्याने मजुरीचा खर्चही वाचतो.
- राहुल बर्वे

सायकलने दररोजची फेरी
कष्टाशिवाय पर्याय नाही असे सांगणारे रवींद्र बर्वे ७२ व्या वर्षीही दररोज सायकलने मिरजोळेतील मोहल्ल्यामध्ये दूध घालतात. संध्याकाळाच हा शिरस्ता कधीच चुकत नाही. गेल्यावर्षी विहीर बांधताना चिरे सोडण्याचे कामही त्यांनी केले. चार किलोमीटर दूरवर चिपळूणमध्ये भाजी घेऊन सायकलची वारी असतेच. तरुणाला लाजवील अशा उत्साहाने ते सारी माहिती देत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com