प्रिव्ही आँरगॅनिक मध्ये आग; कोट्यावधींची हानी

प्रिव्ही आँरगॅनिक मध्ये आग; कोट्यावधींची हानी
प्रिव्ही आँरगॅनिक मध्ये आग; कोट्यावधींची हानी

महाड: औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही आँरगॅनिक मध्ये लागलेल्या भीषण आगीत कंपनी व या कंपनीशेजारी असणारी देवा ड्रील ही कंपनी आगीत भस्मसात झाली. या आगीमध्ये कोट्यावधी रूपयांची हानी झाली असून, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाल्याचे अद्यापही दिसून आले नाही. आग लागल्यानंतर उडालेल्या धावपळीमध्ये कंपनीतील चार कामगार जखमी झाले आहेत.

महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही ऑरगॅनिक युनीट दोन मध्ये आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास आयनॅान प्लँटमध्ये अचानक स्फोट झाला. या नंतरच लगेचच हायड्रोजेनिक प्लांट मध्येही मोठा स्फोट झाला. स्फोटाची मालिका सुरू असल्याने आगीने पाहता क्षणी रौद्र रूप धारण केले. व कंपनीच्या पुढील भागामध्ये आग मोठ्या प्रमाणात पसरली. या आगीचे लोट मोठ्या प्रमामात हवेमध्ये पसरले. दहा किलोमीटर अंतरावर असणा-या महाड शहरालाही धुराचा त्रास सहन करावा लागला. ही आग एवढ्या मोठ्या स्वरूपाची होती की कंपनीच्या बाहेर उभी असणारी कामगारांची शंभर एक वाहने या आगीत जळून गेली. या आगीचे लोण शेजारी असणा-या देवा ड्रील या कंपनीपर्यंत पोहचले. या कंपनीमध्ये असणा-या रासायनिक पिंपाचेही स्फोट होऊ लागले. कंपनीच्या बाहेर ही आग पसरू लागली. महाड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दल, महाड नगरपालिका तसेच परिसरातील पाण्याचे असंख्य टँकर आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नव्हती. मागच्या बाजूनेही ही आग हळूहळू पसरू लागली होती. याच दरम्यान मातीचे व खडीचे ट्रक एका पाठोपाठ आणून आगीच्या परीसरामध्ये टाकले जात होते. तरीही धूराच्या त्रासामुळे आग विझविण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. स्थानिक अग्निशमन यंत्रणेच्या मर्यादा कमी पडू लागल्याने चिपळूण, रोहा, नागोठणे या ठिकाणाहून अग्निशमन यंत्रणा मागविण्यात आली. पोलीस यंत्रणेकडून हा परिसर तात्काळ बंद करण्यात आला. सुमारे सात ते आठ अॅंम्ब्युलन्सही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र ज्या ठिकाणी आग लागली तेथून रासायनिक द्रावण पसरु लागले. या द्रावणाला लागलेली आग पाण्याने आटोक्यात आणणे कठीण झाल्याने त्या करीता फोमच्या गाड्यांची वाट पहावी लागली त्यामुळे आग आणखीनच पसरली.

आग लागताच कंपनीच्या कामगारांमध्ये मोठया प्रमाणात घबराट निर्माण झाली होती. कंपनीतील सर्व कामगार ताबडतोब बाहेर पडले. या धावपळीत व काहींनी उड्याही मारल्याने ओंकार मांडे, नथुराम मांडे, रमेश मांडे हे कामगार व मदत करण्यासाठी आलेला नागेश देशमुख असे चारजण जखमी झाले. शेजारील देवा ड्रिल, लासा, सानिका व इतर कंपनीत कामगार कंपनी बाहेर सुरक्षिततेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आले. कंपना पासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या आसनपोई, धामणे, जीते, खैरे, नागलवाडी, शेलटोली येथे काळ्या धूराचा त्रास होऊ लागल्याने गावातील ग्रामस्थानाही सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. कंपनी परिसरातील सुमारे तीस कारखान्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. याच कंपनी शेजारी महाड तालुक्याला वीजपुरवठा करणारे सबस्टेशन असून हे स्टेशनही तात्काळ बंद करण्यात आल्याने सपूर्ण तालुक्यातील वीज पुरवठा दुपारपासून बंद करण्यात आला होता.

दरम्यान, कंपनीमध्ये काही कामगार अडकून पडले आहेत की नाही आथवा जीवीत हानी बाबतचा तपशिल आग आटोक्यात आल्यावर मिळू शकेल. या आगीत कोट्यावधी रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. प्रिव्ही कंपनी ही औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपनी असून, या नुकसानीमुळे येथे काम करणा-या शेकडो कामगारांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com