शाळांच्या दर्शनी भागात तक्रार पेटी बसवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

शासन मान्यताप्राप्त राज्यातील सर्व मंडळाच्या शासकीय आणि खाजगी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्चमाध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी बसवणे शाळा व्यवस्थापकांना बंधनकारक केले आहे. शालेय शिक्षण विभागाने तसा अध्यादेश काढला आहे.

कणकवली - शासन मान्यताप्राप्त राज्यातील सर्व मंडळाच्या शासकीय आणि खाजगी प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्चमाध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी बसवणे शाळा व्यवस्थापकांना बंधनकारक केले आहे. शालेय शिक्षण विभागाने तसा अध्यादेश काढला आहे. यामुळे विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना त्यांच्या न्याय मागण्या प्रशासनापर्यंत पोहचवणे शक्‍य होणार आहे. तक्रारपेटी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. आठवड्यातून एकदा ही पेटी तपासत असताना पोलिस, विद्यार्थ्यी आणि पालक तसेच शिक्षक प्रतिनिधीनी उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकिय तसेच खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रार पेट्या बसवण्यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही तत्काळ करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने काढले असून तसेच परिपत्रकात शाळा व्यवस्थापकांना दिले आहेत. ही तक्रारपेटी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वांना दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक असणार आहे. तसेच ही तक्रारपेटी आठवड्यातून एकदा संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, पोलिसांचे प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात यावी असे या आदेशात म्हटले आहे.

ज्या क्षेत्रात पोलीस पाटील उपलब्ध आहेत अशा क्षेत्रातील शाळांनी तक्रारपेटी उघडताना त्यांची सेवा उपलब्ध करून घ्यावी, तसेच ज्या ठिकाणी पोलीस प्रतिनिधी उपलब्ध करणे शक्‍य नसेल त्या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीत तक्रारपेटी उघडण्यास हरकत नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रारपेटीत संवदेनशील स्वरूपाची तक्रार असल्यास तक्रारीबाबत तत्काळ पोलीस यंत्रणेचे साहाय्य घेण्यात यावे अशी सूचना करण्यात आली आहे. पेटीतील सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत आवश्‍यक ती कार्यवाही करण्यात यावी. ज्या तक्रारी शालेय पातळीवर निकाली काढणे शक्‍य असतील त्या तत्काळ निकाली काढाव्यात. इतर तक्रारी मात्र क्षेत्रीय कार्यालयामाफत शासनापर्यंत पोहचवाव्यात, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या पेटीत तक्रार करणाऱ्याचे नाव गुप्त राहील व तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थिनी अथक महिला शिक्षकांच्या लैंगिक छळाबाबत काही तक्रारी असतील तर त्या महिला तक्रार निवारण समितीकडे द्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे.

शाळाबाह्य तक्रारीची दखल घेणार
शाळेच्या परिसरात किंवा शाळेत येता - जाता प्रवासात होणारी छेडछाड, विद्यार्थ्याचे शोषन, वाहतूकदारांकडून होणारी पिळवणूक, रोड रोमियोंकडून होणारा त्रास अशा स्वरूपाच्या तक्रारी ही येथे लिखीत स्वरूपात देता येणार आहेत. तक्रारदाराचे नाव मात्र गुप्त ठेवून कारवाई केली जाणार आहे.