अपंग पुनर्वसन संस्थेला पाच लाखांची देणगी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

गुहागर - अपंग पुनर्वसन संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून नियोजित अपंग संकुलासाठी 5 लाखांची देणगी देत असल्याची घोषणा उद्योजक विवेक सुरा यांनी केली. दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू विजय मेहता यांनी संस्थेचे सल्लागार राहण्यासाठी संमती दिली. मुंबईतील ज्येष्ठ समाजसेविका अरुणा नय्यर यांनी संस्थेला सहाय्यभूत होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अपंग पुनर्वसन संस्थेचा 15 वा वर्धापन दिन सोहळा भविष्यातील स्वप्नांच्या पूर्तीसाठी बळ देणारा ठरला. 

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा 15 वा वर्धापन दिन उत्साहात झाला. उमराठ येथील अपंग दाम्पत्य जोशी यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त उभारलेल्या गुढीचे पूजन सौ. अरुणा नय्यर यांनी केले. ढोल-ताशांच्या गजरात (कै.) छगनदास कृष्णदास सुरा (खेड) अपंग पुनर्वसन संकुल प्रवेशद्वाराचे उद्‌घाटन पुणे येथील श्रीमती कुमुदिनी मदन सुरा व उद्योजक विवेक सुरा यांनी केले. विवेक सुरा यांनी संस्थेला 5 लाखांची देणगी देत असल्याचे जाहीर केले. सौ. नय्यर यांनी मुंबईतील विविध संस्थांच्या मदतीने आर्थिक तसेच अन्य मदत करण्याचे जाहीर केले. या वेळी अपंगत्वावर मात करून स्वकर्तृत्वावर यशस्वीपणे उद्योग, व्यवसाय सांभाळणारे प्रकाश गणपत कांबळे (दोडवली), सुनील सोनू मूकनाक (काळसूर कौंढर), सुनील सखाराम रांजाणे (वरवेली), तसेच अनिल कुंभार जामसूत यांना स्वयंसिद्ध पुरस्काराने गौरवण्यात आले. पॅरा ऑलिम्पिकमध्ये 3 पदके मिळविणाऱ्या पालपेणेतील आशिष आदवडेला अष्टपैलू खेळाडू म्हणून सन्मानाने गौरविण्यात आले. या वेळी उपसभापती पांडुरंग कापले, म.सा.प.चे कोकण प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, उद्योजक राजन दळी, लोटिस्माचे विनायक ओक, तसेच सुरा परिवारातील सदस्य उपस्थित होते. या वेळी आमदार भास्कर जाधव, तसेच सभापती विभावरी मुळे यांनी कार्यालयात येऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 

गेली 14 वर्षे सर्व अपंगांना सोबत घेऊन शिस्तबद्धपणे संस्था चालविणे ही बाब वाखाणण्याजोगी आहे. संस्थेच्या अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी या संस्थेचा नव्याने नियुक्त सल्लागार म्हणून मी विशेष प्रयत्न करीन. 
- विजय मेहता, माजी कुलगुरू, दापोली कृषी विद्यापीठ. 

Web Title: Five lakh donations rehabilitation institution for disabled