पन्नास लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह चार जण ताब्यात

पन्नास लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह चार जण ताब्यात
पन्नास लाख रुपयांच्या जुन्या नोटांसह चार जण ताब्यात

मालवण (सिंधुदुर्ग): मुंबईतून मोटारीने एक हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या सुमारे 50 लाख रुपयांच्या नोटा आणणार्‍या चार जणांना येथील पोलिसांच्या पथकाने सुकळवाड बाजारपेठ येथील पाताडेवाडी साईमंदिर येथे रंगेहाथ पकडले. संशयितांना रोख रक्कम तसेच मोटारीसह ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती कोल्हापूर येथील आय डी विभागास देण्यात आली असून उद्या ते येथे पुढील तपासासाठी येणार असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधिकारी अमोल साळुंखे यांनी दिली.

याबाबतची माहिती अशी ः मुंबई येथून एका मोटारीतून मोठ्या प्रमाणात चलनातून रद्द केलेल्या नोटा आणल्या जात असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलिस अधिकारी अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रूपेश सारंग, मंगेश माने, विल्सन डिसोझा, शैलेश खडपकर यांच्या पथकाने सापळा रचला. मुंबई येथून येणारी मोटार क्रमांक एम. एच. 03 बीसी- 5929 ही सुकळवाड बाजारपेठ पाताडेवाडी साईमंदिर येथे येताच पोलिसांनी गाडी अडवून तिची तपासणी केली असता प्लास्टिकच्या बॅगेत चलनातून रद्द केलेल्या एक हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात आढळून आल्या.

पोलिसांनी गाडीतील संशयित आरोपी सुधीर शांताराम खामकर (वय 53 रा. लांजा- रत्नागिरी), मारूती तुकाराम मुटल (वय 40 रा. बेलापूर ठाणे), नितीन नंदकुमार गावडे (वय 33 रा. घणसोली नवी मुंबई), बिरबलकुमार गुप्ता (वय 31 रा. विक्रोळी मुंबई) यांना रोकड तसेच मोटारीसह ताब्यात घेत येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस ठाण्यात पैशाची मोजदाद केली असता एक हजार रुपयांच्या नोटांची सुमारे 50 लाख रुपयांची रोकड असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात स्पेसिफाईड बँक नोट अ‍ॅक्ट 2007 कलम 5, 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयडी विभागांतर्गत तपास होणार
चलनातून रद्द झालेल्या सुमारे 50 लाख रुपयांच्या नोटा संशयितांकडे आढळून आल्या. या नोटा नेमक्या कशासाठी येथे आणल्या जात होत्या याचा तपास केला जाणार आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास केला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या घटनेची माहिती कोल्हापूर येथील आय डी विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली आहे. त्यानुसार या आय डी विभागाचे अधिकारी उद्या ता. 1 येथे पुढील तपासासाठी येणार आहेत अशी माहिती प्रभारी पोलिस अधिकारी अमोल साळुंखे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com