एसटीत स्मार्टफोनवर आता पाहा मोफत चित्रपट!

गुहागर - गुहागर आगाराच्या एसटीमध्ये बसविण्यात आलेले यंत्र इन्फो कंपनीचे उपकरण.
गुहागर - गुहागर आगाराच्या एसटीमध्ये बसविण्यात आलेले यंत्र इन्फो कंपनीचे उपकरण.

गुहागर आगारात सेवा सुरू - ग्रामीण प्रवाशांना आकर्षित करण्याची योजना

गुहागर - मनोरंजनातून व्यवसायवृद्धी आणि प्रवासात ग्राहकाची करमणूक करण्यासाठी एसटी महामंडळाने नवीन युक्ती शोधून काढली आहे.

एसटीमध्ये उपकरण बसवून वाय-फायद्वारे ते स्मार्टफोनला जोडून चित्रपट पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आगारातील सर्व एसटी बसेसना हे उपकरण जोडण्यात आले आहे.

आज अनेक खासगी बसेसमध्ये चित्रपट दाखवण्याची व्यवस्था केलेली असते. वातानुकूलित, आरामदायी प्रवासाबरोबर करमणुकीची सेवा प्रवाशांना दिली जाते. एसटी महामंडळाने मोठ्या शहरांदरम्यान शिवनेरीसारख्या वातानुकूलित, आरामदायी, करमणुकीची व्यवस्था असलेल्या गाड्या प्रवाशांना यापूर्वीच उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र सर्वांधिक प्रवासी असणाऱ्या ग्रामीण भागात एसटीच्या जुन्या, खडखडाट करणाऱ्या गाड्या वापरल्या जातात. ग्रामीण मार्गावर वातानुकूलित सेवा देणे एसटीला परवडणारे नाही. मात्र ग्रामीण भागात मनोरंजनाचा 
पर्याय एसटीने उपलब्ध करून दिला आहे.

गुहागर आगारातील ८० एसटी गाड्यांमध्ये यंत्र इन्फो या कंपनीमार्फत एक उपकरण बसविण्यात आले आहे. यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेतील विनोदी, ॲक्‍शनपट, कौटुंबिक मराठी आणि हिंदी चित्रपट साठवलेले आहेत. एसटीत बसलेल्या प्रवाशांच्या स्मार्टफोनला हे उपकरण वाय-फायद्वारे जोडल्यावर मोबाइल डाटाच्या वापराशिवाय उपकरणात साठवलेल्या चित्रपटांपैकी कोणताही चित्रपट पाहता येणार आहे. स्मार्टफोन उपकरणाला जोडून चित्रपट कसा पाहायचा याच्या माहितीचे स्टिकरही एसटीत चिकटवले आहेत. 

सर्व रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फायची सुविधा केंद्र सरकारने पुरवल्यानंतर राज्य सरकारने एसटीच्या गाड्यांतून करमणुकीचे साधन प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहे. या सेवेतून प्रवाशांच्या संख्येत वाढ व्हावी, नवी पिढी एसटीकडे आकर्षित व्हावी, हादेखील एसटीचा अंतस्थ हेतू आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व एसटी गाड्यांमध्ये हे उपकरण बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मेअखेरपर्यंत ही सुविधा सर्व गाड्यांत कार्यान्वित होईल. सध्या मराठी व हिंदीतील चित्रपट या उपकरणात साठविलेले असून दर पंधरा दिवसांनी हे चित्रपट बदलले जातील. उपकरणाची देखभाल, डेटामधील बदल या सर्वांवर यंत्र इन्फो या कंपनीचे नियंत्रण असणार आहे. 
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रत्नागिरी जिल्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com