निधीनंतरही अग्निशमन यंत्रणा रखडली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

सावंतवाडी - दोन कोटी रुपये मंजूर आहेत; परंतु जागाच ताब्यात नसल्यामुळे येथील पालिकेच्या वतीने पालिकेच्या शेजारी उभारण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे जुन्याच बंबाच्या माध्यमातून सेवा पुरविण्याची वेळ पालिकेवर आली आहे. 

सावंतवाडी - दोन कोटी रुपये मंजूर आहेत; परंतु जागाच ताब्यात नसल्यामुळे येथील पालिकेच्या वतीने पालिकेच्या शेजारी उभारण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा कचाट्यात सापडली आहे. त्यामुळे जुन्याच बंबाच्या माध्यमातून सेवा पुरविण्याची वेळ पालिकेवर आली आहे. 

नियोजित जागा ही बांधकाम विभागाची असल्यामुळे ताब्यात मिळण्यासाठी मंत्रालय स्तरावरूनच अडचणी येत आहेत. जोपर्यंत नव्या केंद्राचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत नवा बंब तसेच अन्य आधुनिक साधने घेता येणार नाहीत. त्यामुळे त्याचा फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागण्याची शक्‍यता आहे. येथील पालिकेच्या वतीने पालिकेच्या शेजारी असलेल्या जागेत आधुनिक अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय पाच ते सहा वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. संबंधित नियोजित जागेत बांधकाम विभागाचे कार्यालय होते. त्यानंतर त्याचा वापर आयटीआय केंद्रासाठी करण्यात आला आणि काही दिवसांनी पुन्हा त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय बसविले. 

शहराला तत्काळ सेवा मिळावी, यासाठी पालिकेशेजारी बंबाची सेवा मिळावी, यासाठी या जागेतच अग्निशमन केंद्र मंजूर करण्यात आले. त्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले; परंतु ही जागा ताब्यात घेण्यासाठी मंत्रालय स्तरावरून अडचणी येत असल्यामुळे अद्यापपर्यंत अग्निशमन केंद्राचा तिढा सुटलेला नाही. परिणामी या केंद्रासाठी आवश्‍यक असलेले नवे बंब तसेच अन्य यंत्रणा खरेदी करता येणार नाही, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. 

याबाबत येथील पालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी आधुनिक सोईंनीयुक्त असलेले अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे; परंतु बांधकाम विभागाची जागा असल्याने ती सावंतवाडी पालिकेकडे वर्ग करण्याच्या प्रक्रियेबाबत आवश्‍यक असलेला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तो प्रस्ताव मार्गी लागल्यानंतर तत्काळ काम सुरू करण्यात येणार आहे. 

पालकमंत्री प्रयत्नशील... 
याबाबत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""शहराला सेवा मिळण्याच्या दृष्टीने हा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर पाठपुरावा करीत आहेत. येत्या काही दिवसांत यावर योग्य तो तोडगा निघेल, असा विश्‍वास आपल्याला आहे. त्यानंतर लोकांच्या सेवेसाठी सुसज्ज असे अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे.'' 

यंत्रणेचे तीन तेरा... 
याबाबत कॉंग्रेसचे नगरसेवक ऍड. परिमल नाईक म्हणाले, ""अग्निशमन केंद्राचा प्रश्‍न मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यानंतर नव्याने बंब तसेच अन्य साधनसामग्री खरेदी करणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, सद्यस्थिती लक्षात घेता बंब अत्यंत मोडकळीस आला आहे. त्यावर लावण्यात आलेला आपत्कालीन दिवा बंद आहे. त्यामुळे अचानक अनुचित प्रकार घडल्यास काय करणार? याचे उत्तर पालिका पदाधिकाऱ्यांकडे तूर्तास तरी नाही.''