उधाणाच्या लाटा पोचल्या जणू श्रीदर्शनासाठी...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

गणपतीपुळे मंदिर - कठडा तुटला, संरक्षक भिंतीचे दोन तुकडे

गणपतीपुळे - येथे समुद्रात काल (ता. २८) उधाणामुळे उसळलेल्या उंच उंच लाटांनी पर्यटकांना आकर्षित केले. पर्यटकांनी उधाणाच्या या लाटांची मजा घेतली. गेले दोन-तीन दिवस वाढलेल्या समुद्राच्या उधाणामुळे मंदिर परिसरातील संरक्षक भिंतीचे दोन तुकडे झाले.

गणपतीपुळे मंदिर - कठडा तुटला, संरक्षक भिंतीचे दोन तुकडे

गणपतीपुळे - येथे समुद्रात काल (ता. २८) उधाणामुळे उसळलेल्या उंच उंच लाटांनी पर्यटकांना आकर्षित केले. पर्यटकांनी उधाणाच्या या लाटांची मजा घेतली. गेले दोन-तीन दिवस वाढलेल्या समुद्राच्या उधाणामुळे मंदिर परिसरातील संरक्षक भिंतीचे दोन तुकडे झाले.

लाटा आपटत असलेल्या संरक्षक भिंतवजा कठड्यावर पर्यटकांना बसण्यासाठी बाकेही लावण्यात आली आहेत; मात्र गेल्यावर्षी अशाच उधाणामुळे कठड्याच्या अनेक पायऱ्या वाहून गेल्या होत्या. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे मत येथील लोकांनी व्यक्त केले. यावर्षी तर या कठड्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोर दोन तुकडे झाल्याचे पाहायला मिळते. बांधकामाचा दर्जाच या उधाणाने उघडा केला. पावसामुळे पुढील उधाणात लाटा वाढल्याच तर विश्रामगृहाच्या संरक्षण भिंतीलाही धोका निर्माण होऊ शकतो.  

गणपतीपुळेत सध्या पर्यटकांची तुरळकच गर्दी पाहावयास मिळत आहे. गेले दोन दिवस अगदी मोजक्‍या पर्यटकांनीच समुद्रावर जाण्याचे धाडस केले. लाटा संरक्षक भिंतीवर आपटून वर उडत असल्यामुळे लाटांची मजा घेतानाच भिंत तुटल्याचे पर्यटकांच्या लक्षात आले. मोठ्या लाटा गणपतीपुळे देवस्थानच्या कंपाउंड वॉलवर येऊन आदळल्या. त्यामुळे तेथे जाताना अनेकांची घाबरगुंडीही उडाली होती. काही हौशी पर्यटक मात्र लाटा अंगावर झेलताना दिसत होते. 

समुद्र खवळल्याने परिसरात कोणीही आंघोळीसाठी जाऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून समुद्र चौपाटीवर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. दिवसभर सुरक्षारक्षक डोळ्यात तेल घालून पर्यटकांना रोखण्याची कामगिरी बजावत होते. कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संरक्षण कठड्यावर सुरक्षारक्षकांनी पेट्रोलिंगही केले. 

स्वयंभू श्री गजाननाच्या दर्शनासाठी आम्ही कायम येतो. अंगारकीचा योग साधण्यासाठी आलो असताना दर्शन आटोपल्यानंतर समुद्राचे दृश्‍य पाहिल्यानंतर भारावूनच गेलो. उंच उंच लाटा मंदिराच्या कंपाऊंड वॉलला लागत होत्या. हे लाटांचे दृश्‍य आम्ही डोळ्यात साठवून ठेवले. 
- हनुमंत पाटील, कऱ्हाड