नरेंद्र डोंगरावर आज कचरा मुक्ती मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

अशी असेल मोहीम... 
मोहिमेला नरेंद्राच्या पायथ्यापासून उद्या सकाळी सात वाजता सुरवात होईल. यानंतर ग्रुप करून माथ्यापर्यंत सफाई मोहीम होईल. यात विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, संघटना, मंडळे, त्यांचे प्रतिनिधी, नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. यात सहभागासाठी सकाळी सात वाजता हनुमान मंदिराजवळ जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सावंतवाडी - नरेंद्र डोंगराला कचरा मुक्त करण्याच्या "सकाळ'ने हाती घेतलेल्या मोहिमेला पालिकेचे पूर्ण सहकार्य राहील. नागरिकांनीही यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. हा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटण्यासाठी प्रयत्न व्हावे, असे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे सांगितले. 

नरेंद्र डोंगरावर दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचऱ्याचा खच पडला आहे. या बाबतचे वृत्त "सकाळ'ने दिले होते. यावर न थांबता नरेंद्र डोंगर कचरामुक्त करण्यासाठीच्या अभियानात "सकाळ'ने पुढाकार घेतला आहे. याला येथील पालिका, वाईल्ड कोकण, सिंधु निसर्ग पर्यावरण प्रतिष्ठान, सिंधु मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, लुपीन फाउंडेशन, कोमसाप सावंतवाडी, आरती मासिक संस्था, शिक्षक वाङमय मंडळ सावंतवाडी, आरती मासिक संस्था, शिक्षक वाङमय मंडळ सावंतवाडी, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वनविभाग यांनी सहकार्याची ग्वाही दिली आहे. 

अनेक नागरिकांनीही "सकाळ'शी संपर्क साधून सहभाग घेणार असल्याचे व हा उपक्रम स्त्युत्य असल्याचे सांगितले. येथील पालिकेत झालेल्या बैठकीत याबाबत नुकतेच नियोजन करण्यात आले. या वेळी उपक्रमास पूर्ण सहकार्याची ग्वाही नगराध्यक्ष साळगावकर यांनी दिली. 

स्वच्छता मोहिमेला उद्या (ता. 12) सकाळी सात वाजता नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिराच्या जवळून सुरवात होणार आहे. मोहीम साधारण दोन तास चालेल. यानंतरही ही समस्या कायमस्वरूपी नाहीशी करण्यासाठी उपाय-योजण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. श्री. साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, "सकाळ'चे वरिष्ठ उपसंपादक शिवप्रसाद देसाई, वाईल्ड कोकणचे सचिव डॉ. गणेश मर्गज, "सकाळ'चे वरिष्ठ जाहिरात प्रतिनिधी हेमंत खानोलकर, पालिकेचे दीपक म्हापसेकर, विनोद सावंत, श्रीमती शिरोडकर आदी उपस्थित होते. 

सामाजिक प्रदूषण होतेय... 
नरेंद्र डोंगरावर कचरा टाकण्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषण होतेच; मात्र तेथे दारूच्या पार्ट्या दिवसा ढवळ्या रंगतात. पत्त्याचे फड रंगतात. आताही तेथे असलेल्या कचऱ्यात दारूच्या बाटल्या, प्लास्टिक याच्याबरोबर पत्तेही ठळकपणे दिसतात. सिगारेटचे झुरके ओढणारी तरुणांची टोळकी तर कायम असतात. यामुळे येथे पर्यावरणाबरोबरच सामाजिक प्रदूषणही होत असल्याचा मुद्दा नियोजन बैठकीत चर्चेला आला. 

अशी असेल मोहीम... 
मोहिमेला नरेंद्राच्या पायथ्यापासून उद्या सकाळी सात वाजता सुरवात होईल. यानंतर ग्रुप करून माथ्यापर्यंत सफाई मोहीम होईल. यात विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, संघटना, मंडळे, त्यांचे प्रतिनिधी, नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. यात सहभागासाठी सकाळी सात वाजता हनुमान मंदिराजवळ जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: garbage freedom campaign in sawantwadi