सिंधुदुर्गात  घाट रस्ते खचताहेत

एकनाथ पवार
सोमवार, 22 मे 2017

पश्‍चिम महाराष्ट्र आणि सिंधुदुर्गाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील चारही घाटांना सध्या वेगळीच समस्या सतावते आहे. याआधी केवळ दरडीचा अधिक धोका असलेले हे घाट आता खचू लागले आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. मात्र तरीही ज्या पद्धतीने घाटरस्त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे तेवढे लक्ष बांधकाम विभाग देताना दिसत नाही. गेल्यावर्षी पावसाळ्यात खचलेल्या रस्त्यांची डागडुजी अद्याप झालेली नाही. गाळाने भरलेली गटारेही मोकळी केलेली नाहीत. घाट रस्ते टिकविण्याच्या अनुषंगाने कोणतेही ठोस धोरण राबविले जात नसल्याने हे घाटरस्ते धोक्‍यात आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्र आणि सिंधुदुर्गाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील चारही घाटांना सध्या वेगळीच समस्या सतावते आहे. याआधी केवळ दरडीचा अधिक धोका असलेले हे घाट आता खचू लागले आहेत. ही बाब रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. मात्र तरीही ज्या पद्धतीने घाटरस्त्यांच्या संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे तेवढे लक्ष बांधकाम विभाग देताना दिसत नाही. गेल्यावर्षी पावसाळ्यात खचलेल्या रस्त्यांची डागडुजी अद्याप झालेली नाही. गाळाने भरलेली गटारेही मोकळी केलेली नाहीत. घाट रस्ते टिकविण्याच्या अनुषंगाने कोणतेही ठोस धोरण राबविले जात नसल्याने हे घाटरस्ते धोक्‍यात आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारे घाट
सिंधुदुर्ग आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारे प्रमुख करूळ, भुईबावडा, फोंडाघाट आणि आंबोली हे चार घाटरस्ते आहेत. या चारही घाटमार्गांवरून रोज शेकडो टन वाहतूक होते. यापैकी करूळ आणि भुईबावडा घाट एकमेकांसाठी पर्याय आहेत. फोंडाघाट दोन्ही घाटांपासून १८ किलोमीटर अंतरावर आहे.

घाट खचताहेत
काही वर्षांपूर्वीपर्यंत पावसाळी हंगामात घाटरस्त्यातील दरडी याच वाहतुकीतील अडसर मानल्या जात; मात्र काही वर्षात घाटरस्ते खचण्याचे प्रमाण वाढले आहे. दरडीपेक्षा रस्ते खचणे अधिक धोकादायक मानले जाते. कधी कधी तर पूर्ण रस्ताच खचला जातो. हे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे आणि ही बाब चिंतेची आहे. करूळ घाटात चार ठिकाणी रस्ता खचला आहे तर भुईबावडा घाटात तीन ठिकाणी रस्ता खचला आहे. फोंडाघाटात एका ठिकाणी किरकोळ स्वरूपात रस्ता खचला आहे. प्रत्येक पावसाळ्यात घाटरस्ते खचण्याचे प्रकार वाढतच आहे. त्यामुळे भविष्यात हे प्रकार वाहतुकीच्या दृष्टीने घातक ठरणार आहेत.

म्हणून खचताहेत घाटरस्ते
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामचलावू आणि मलमपट्टीचे धोरण घाटरस्त्यांच्या मुळावर येऊन ठेपले आहे. घाटरस्ते बनविताना रस्त्यांच्या एका बाजूला काही ठिकाणी मातीचा भराव करून रस्त्यांची बांधणी केली आहे. पावसाळ्यात डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी येते. या पाण्याच्या निचऱ्याचे नियोजन नसल्यामुळे हे सर्व पाणी रस्त्यावरून भराव केलेल्या ठिकाणी झिरपते. त्यातून रस्त्याला सुरुवातीला छोटी भगदाडे पडतात आणि त्यानंतर रस्ता खचू लागतो. बांधकाम विभागाच्या वतीने या छोट्या भगदाडांचे बांधकाम कधीही तातडीने केले जात नाही. तेथे भगदाड पडून रस्ता खचतो.

गटारे गाळाने तुडुंब
घाटरस्त्याच्या डोंगराकडील भागाला कोट्यवधी रुपये खर्चून गटारे बांधली आहेत. पाणी रस्त्यावर येऊ नये हा त्यामागचा बांधकामचा हेतू; परंतु ही सर्व गटारे दगडमातीने भरली आहेत. त्यामुळे डोंगरावरून येणारे भरमसाट पाणी कधीच गटारातून वाहत नाही तर ते रस्त्यावरून वाहत जाते. या पाण्याचा प्रवाह इतका मोठा असतो की कधी कधी या पाण्यातून वाहून येणाऱ्या दगडमातीमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. आतासुद्धा सर्वच घाटांतील गटारे पूर्णपणे भरलेली आहेत. पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत; मात्र बांधकाम विभाग सुशेगाद आहे.

रस्ते दुरुस्तीकडे लागले डोळे
गेल्यावर्षी पावसाळ्यात चारही घाटांमध्ये आठ ते दहा ठिकाणी रस्ते खचले आहेत. यापैकी बहुतांशी ठिकाणे करूळ आणि भुईबावडा घाटातील आहेत. हे रस्ते खचल्यानंतर आठ ते नऊ महिने उलटले आहेत. परंतु ही कामे करण्यासाठी बांधकाम विभागाला वेळच मिळालेला नाही. पावसाळ्यापूर्वी खचलेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी केली नाही तर पूर्ण रस्ता खचून वाहतूक ठप्प होण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे खचलेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी नेमकी करणार कधी, हा प्रश्‍न आहे.

उपायांकडे दुर्लक्ष
घाट वाहतूक सुरक्षित व्हावी या उद्देशाने काही वर्षांपूर्वी सातत्याने घाटरस्त्यांमध्ये उपाययोजना केल्या जात होत्या. अपघात होऊ नये यासाठी रस्त्यांलगत संरक्षक कठडे, क्रॅश बॅरियर्स दरीकडील बाजूने उभारले गेले. दरडी थेट रस्त्यावर कोसळू नयेत म्हणून लोखंडी नेटचा वापर करण्यात आला. खचलेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीकरिता गॅबियन पद्धतीचा वापर करण्यात आला. या उपाययोजनांचा चांगला परिणामसुद्धा झाला होता. परंतु गेल्या काही वर्षांत अशा पद्धतीच्या कोणत्याच उपाययोजना बांधकाम विभागाने घाटरस्त्यांमध्ये राबविलेल्या नाहीत.

निकृष्ट कामाचे ग्रहण
घाटांमध्ये आतापर्यत कोट्यवधी रुपयाची कामे झाली आहेत. परंतु या कामांच्या दर्जाबाबत शंका घेण्यास वाव आहे. कामे निकृष्ट झाल्यामुळे अनेक सरक्षंक कठडे कोसळून पडले आहेत. त्यामुळे घाटात होणाऱ्या निकृष्ट कामांना आळा बसण्याची गरज आहे. पावसाळी हंगामात घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. परंतु या दरडी हटविण्यासाठी वारेमाप खर्च केला जातो. या खर्चाचे मूल्यमापन व्हायला हवे, जेणेकरून गैरव्यवहारांना आळा बसू शकेल.

दुपदरीकरणात अडसर
कोल्हूापूर-तळेरे राज्यमार्गाचे आता राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात आहे. हा मार्ग दुपदरीकरण करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे; मात्र या रस्ता दुपदरीकरणात घाट रस्ते अडथळे ठरणार आहेत. घाटात दुपदरीकरण करताना शासनाला वेगळा पर्यायाचा अवलंब करावा लागणार आहे.

स्ट्रक्‍चरल ऑडिटची गरज
पश्‍चिम महाराष्ट्र आणि जिल्ह्याला जोडणाऱ्या घाटरूपी वाहिन्या टिकविण्यासाठी शासनाने घाटरस्त्यांबाबत ठोस धोरण आखायला हवे. निधी नसल्यामुळे घाटातील अनेक कामे रखडली असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले जाते. अलीडील काही वर्षात घाटांच्या दुरुस्तीसाठी दिल्या जाणाऱ्या निधीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक कामेही झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने घाटांसाठी धोरण आखून कामे करायला हवीत. याशिवाय घाटांची एकूणच स्थिती पाहता वरिष्ठ स्तरावरून या घाटांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट होणे आवश्‍यक आहे. संपूर्ण घाटरस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

करूळ आणि भुईबावडा घाटातील खचलेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या १२ कामांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले आहेत. या कामासाठी अंदाजे दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही कामे लवकरच मंजूर होतील. त्यानंतर तातडीने ही कामे पूर्ण करण्यात येतील.
- एस. डी. मोरजकर, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

विभाग पोरका... कामे रखडली
करूळ आणि भुईबावडा हे महत्त्वाचे दोन घाटमार्ग वैभववाडी तालुक्‍यात आहेत. या घाटांची जबाबदारी असणाऱ्या वैभववाडी बांधकाम विभागाला गेल्या सहा महिन्यापासून वरिष्ठ अधिकारीच नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांविना हा विभाग पोरका आहे. कणकवलीतून आठवड्यातील एखाद्या दिवसाकरिता अधिकारी पाठविला जातो. त्यामुळे येथील सर्व कामे रखडली आहेत.

...अशी आहे घाटांची स्थिती
जिल्ह्यातील चारही घाटांची अवस्था भयावह आहे. 
चारही घाटांतून पावसाळ्यात प्रवास करणे धोक्‍याचे.
चारही घाटांना दरडीचा धोका.
करूळ घाटात दरडी केव्हाही कोसळतील अशी आठ ठिकाणे.
भुईबावडा घाटातील दीड किलोमीटरचा रस्ता धोकादायक दरडींचा.
फोंडाघाटात पाच ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्‍यता.
आंबोली घाटरस्त्याला दरडीचा धोका अधिक.
करूळ घाटरस्त्यांच्या काही भागाचे नूतनीकरण
फोंडाघाट आणि आंबोलीतील रस्ता वाहतुकीस योग्य
भुईबावडा घाटातील रस्ता पूर्णतः उखडला. रस्त्यात मोठमोठे खड्डे