मुलीला खेळविण्याआधीच तिने मिटले डोळे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

सावंतवाडी : तब्बल बारा वर्षांनी त्यांचा पाळणा हलला; परंतु आपल्या मुलीला खेळविण्याआधीच रक्तदाब कमी झाल्यामुळे मातेचे डोळे मिटले आणि ते तान्हुले बाळ आईच्या मायेसाठी पोरके झाले.

मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या महिलेला वाचविण्यासाठी नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले; परंतु नियतीपुुढे काहीच चालले नाही. आपल्या जीवनात आलेले अभाग्य त्या कुटुंबीयांनीसुद्धा सहजपणे स्वीकारले आणि झालेल्या प्रकाराबाबत आपली काही तक्रार नाही, असे सांगून पाणावलेल्या जड डोळ्यांनी त्या कोवळ्या जीवाला घेऊन देवगडची वाट धरली.

सावंतवाडी : तब्बल बारा वर्षांनी त्यांचा पाळणा हलला; परंतु आपल्या मुलीला खेळविण्याआधीच रक्तदाब कमी झाल्यामुळे मातेचे डोळे मिटले आणि ते तान्हुले बाळ आईच्या मायेसाठी पोरके झाले.

मृत्यूशी झुंज देणाऱ्या त्या महिलेला वाचविण्यासाठी नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले; परंतु नियतीपुुढे काहीच चालले नाही. आपल्या जीवनात आलेले अभाग्य त्या कुटुंबीयांनीसुद्धा सहजपणे स्वीकारले आणि झालेल्या प्रकाराबाबत आपली काही तक्रार नाही, असे सांगून पाणावलेल्या जड डोळ्यांनी त्या कोवळ्या जीवाला घेऊन देवगडची वाट धरली.

ही दुर्दैवी आणि काळजाचा ठेका चुकविणारी घटना आज येथील कुटीर रुग्णालयात घडली.

प्रसूतीनंतर काही वेळातच महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे येथील कुटीर रुग्णालयात घडली. सुषमा संतोष पवार (35, रा. देवगड-शिरगाव) असे तिचे नाव आहे. रक्तदाब अचानक कमी झाल्याने हा प्रकार घडला, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी ः देवगड-शिरगाव येथे राहणाऱ्या सौ. पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने तळेबाजार येथून कणकवली येथे आणण्यात आले; परंतु दरम्यानच्या काळात सौ. पवार यांचा रक्तदाब वाढला. अशा परिस्थितीत त्यांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ओरोस येथे हलविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना ओरोस रुग्णालयात आणले. तेथील अधिकाऱ्यांशी कुटुंबीयांनी चर्चा केली असता सौ. पवार यांना रक्तदाब जैसे थे असल्याने, तसेच त्यांचे वय जास्त असल्याने शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही, असे सांगून प्रसूतीसाठी तिला सावंतवाडी कुटीर रुग्णालयात नेण्याच्या सूचना केल्या. तेथून पुन्हा 108 रुग्णवाहिकेतून सौ. पवार यांना येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची रात्री पावणेदहाच्या सुमारास डॉ. ज्ञानेश्‍वर दुर्भाटकर यांनी शस्त्रक्रिया केली. ही प्रक्रिया यशस्वी पार पडली. त्यांला कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. काही वेळाने शस्त्रक्रिया विभागातून तिला बाहेर आणण्यात आले. तीन तासांनंतर तिची गुंगी उतरली. त्यानंतर तिने आपल्या नवजात मुलीला कुशीत घेतले. नातेवाइकांशी चर्चा केली; परंतु काही वेळाने आपल्याला चक्कर येते, डोके जड झाले आहे, असे त्यांनी नातेवाइकांना सांगितले. या वेळी तत्काळ तेथे असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला; परंतु अचानक पुन्हा तिचा रक्तदाब कमी झाला. तो स्थिर करण्यासाठी सौ. पवार यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले; परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकाराबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर ऐवळे यांनी येथील पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सौ. पवार यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 12 ते 13 वर्षांनी सौ. पवार यांना आई होण्याचे सौभाग्य लाभले होते; परंतु प्रसूतीदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकाराबाबत आपली कोणतीही तक्रार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी या घटनेच्या चौकशीसाठी येथे दाखल झाले होते. उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही; मात्र रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री. ऐवळे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित महिलेचा रक्तदाब कमी झाला होता. तो स्थिर करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले; परंतु सर्व प्रयत्न फोल ठरले. रक्तदाब कमी झाल्याने असा प्रकार घडू शकतो; परंतु नेमके कारण समजण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकाराची जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांत नेमके कारण समजू शकेल. सौ. पवार यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: The girl closed her eyes already host ...