माकडताप रोखण्यात पालकमंत्री अपयशी - नीतेश राणे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

बांदा - माकडतापाचा फैलाव रोखण्यासाठी नुसत्या आढावा बैठका घेऊन काहीही साध्य होणार नाही. माकडताप साथ आटोक्‍यात आली नाही हे पालकमंत्र्याचे नेतृत्व अपयशी झाल्याचे द्योतक आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी आज केला. माकडताप साथ संपूर्ण जिल्हाभरात पसरली तर प्रशासन काय उपाययोजना करणार हे यावरून दिसत असल्याचेही ते या वेळी म्हणाले. या साथीमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून मदत देणार असे पालकमंत्री जाहीर करतात. त्यांनी केर येथे याच साथीत मृत पावलेल्यांना किती मदत दिली ते सांगावे आणि नंतर खोटी आश्‍वासने द्यावी. याबाबत मी अधिवेशनात जाब विचारणार आहे, असेही श्री. राणे म्हणाले.

बांदा - माकडतापाचा फैलाव रोखण्यासाठी नुसत्या आढावा बैठका घेऊन काहीही साध्य होणार नाही. माकडताप साथ आटोक्‍यात आली नाही हे पालकमंत्र्याचे नेतृत्व अपयशी झाल्याचे द्योतक आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी आज केला. माकडताप साथ संपूर्ण जिल्हाभरात पसरली तर प्रशासन काय उपाययोजना करणार हे यावरून दिसत असल्याचेही ते या वेळी म्हणाले. या साथीमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून मदत देणार असे पालकमंत्री जाहीर करतात. त्यांनी केर येथे याच साथीत मृत पावलेल्यांना किती मदत दिली ते सांगावे आणि नंतर खोटी आश्‍वासने द्यावी. याबाबत मी अधिवेशनात जाब विचारणार आहे, असेही श्री. राणे म्हणाले. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील माकडतापबाधित रुग्णांची विचारपूस करण्यासाठी राणे आज येथे आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार राणे यांनी आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या सर्व रुग्णांची विचारपूस केली. या वेळी कोणतीही कमी असल्यास मला सांगा, मी आमच्या माध्यमातून तुम्हाला मदत करेन, असेही त्यांनी आश्‍वासन दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी कोणती यंत्रणा राबविली यांची विचारणा केली. ही साथ लवकरात लवकर आटोक्‍यात आणा अशी सूचना त्यांना केली. श्री. राणे म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत ही साथ याच परिसरात आहे. जर ही साथ जिल्हाभरात पसरली तर तुमच्याकडे एवढा औषध साठा उपलब्ध आहे काय? कोणताही हलगर्जीपणा याबाबतीत खपवून घेणार नाही. साथ आटोक्‍यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.’’

या वेळी राणे पुढे म्हणाले, ‘‘आपल्या जिल्ह्यातील प्रशासनावर कोणाचा वचक नसल्याने ही स्थिती ओढवली आहे. या सर्वाला पालकमंत्री जबाबदार आहेत. नुसत्या आढावा बैठका घेऊन काहीच साध्य होणार नाही. आमचे पालकमंत्री रात्रीचे येऊन बैठका घेतात. याला काय म्हणावे? गोवा, कर्नाटक या दोन्ही राज्यांमधून आपल्या जिल्ह्यातील दोडामार्ग व बांदा परिसरात मृत माकडे टाकल्याने ही साथ जिल्ह्यात आली. याला जबाबदार आपले प्रशासन आहे. ही माहिती प्रशासन का देत नाही? का लपवून ठेवतात? याबाबत शासनामार्फत संबंधितांना जाब विचारणे गरजेचे आहे. फक्त कॅमेऱ्यासमोर अधिकाऱ्यांना दम भरून प्रशासन चालणार नाही. त्यासाठी वचक असायला हवा.’’

या वेळी आरोग्य सभापती आत्माराम पालेकर, माजी सभापती प्रमोद कामत, मनिष दळवी, बांदा शहराध्यक्ष जावेद खतीब, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्‍वर सावंत, मधुकर देसाई, अक्रम खान, प्रवीण देसाई, स्वप्नील नाईक, गुरू सावंत, गजानन गायतोंडे, संदीप बांदेकर, सचिन नाटेकर, विनेश गवस, गौरांग शेर्लेकर, उदय धुरी, दया धुरी, अभिलाष देसाई, नाना सावंत, विलास सावंत, सत्यनारायण गवस, स्वप्नील सावंत, संतोष सावंत आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

प्रमोद कामतांकडून पालकत्व शिका
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालकत्व काय असते हे प्रमोद कामत यांच्याकडून शिकावे. कामत साथ आल्यापासून स्वत:च्या खिशातून रुग्णांना मदत देतात. पालकमंत्री फक्त आढावा बैठका घेतात, असे श्री. राणे म्हणाले.

शेजारच्या राज्यामुळे माकडताप
कर्नाटक आणि गोव्यातून मृत माकडे जिल्ह्याच्या सीमाभागात टाकली जातात. यामुळेच माकडताप येथे पोहोचला आहे. ही माहिती प्रशासन का लपवून ठेवत आहे, असा सवाल आमदार राणे यांनी केला.

Web Title: guardian minister monkey flu unsuccess control Guardian fail in preventing fever