कासव संरक्षण मोहिमेतून पर्यावरण रक्षण

मयूरेश पाटणकर
गुरुवार, 5 एप्रिल 2018

गुहागर - पर्यावरण रक्षणाची जाणीव वाढू लागल्याचे चित्र कासव संरक्षण मोहिमेने रत्नागिरी जिल्ह्यात तयार झाले आहे. जानेवारी महिन्यापासून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात १६ हजार ३६५ कासवांची पिल्ले संरक्षित करण्यात आली. यामध्ये १० गावांतील कासवमित्र आणि ग्रामस्थांचा सहभाग होता. एकेकाळी वेळासमध्ये होणारा कासव महोत्सव आता जवळपास प्रत्येक किनाऱ्यावर होऊ लागला आहे. महोत्सवाला किनाऱ्यांची स्वच्छता, पर्यावरण रक्षण आदी बिंदूही जोडले जाऊ लागलेत.

सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूण या संस्थेने २००३ पासून कासव संरक्षण मोहिमेला सुरुवात केली. मंडणगड तालुक्‍यातील वेळास हे या मोहिमेचे पहिले ठिकाण होते. एकाचवेळी ५० ते ६० कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्याच्या प्रक्रियेला सह्याद्री निसर्गाने २००६ मध्ये महोत्सवाची जोड दिली. त्यातून वेळाससारख्या छोट्या गावात पर्यटन उद्योग वाढीला लागला. साधे हॉटेल नसलेल्या गावात घरगुती राहण्याची व्यवस्थेतून गावकऱ्यांना पैसे मिळू लागले. आज वेळासचा पर्यटन महोत्सव नावारूपाला आला आहे. आता मंडणगडमध्ये वेळास, दापोली तालुक्‍यात लाटघर, आंजर्ला, केळशी, कोळथरे, दाभोळ, कर्दे, मुरूड, पाडले व गुहागर या ठिकाणी कासव संरक्षण केले जाते. डिसेंबर ते मार्च या कालावधीत ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. ग्रामस्थ त्यांचे कोल्हे कुत्र्यापासून रक्षण करतात. वाळूत पुरलेली अंडी संरक्षित करतात. त्यांची नोंद ठेवतात. अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडू लागली की कासव महोत्सवाचे आयोजन करतात. परिसरातील ग्रामस्थांसह अनेक पर्यटक ही पिल्ले पाहण्यासाठी समुद्रावर गर्दी करतात. यातून पर्यटन उद्योगही वाढू लागला आहे.

कासव महोत्सवाच्या ठिकाणी छोटा कार्यक्रम होतो. यामध्ये ऑलिव्ह रिडले कासवाची माहिती, किनाऱ्यावर येण्याची प्रक्रिया, पुरलेल्या अंड्यातून पिल्ले कशी बाहेर येतात. कोणत्या घरट्यातून पिल्ले बाहेर पडतात हे कसे समजते आदी माहिती दिली जाते. कार्यक्रमातून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश सहजपणे मनावर कोरला जातो. स्वाभाविकपणे आलेले पर्यटक समुद्रावर कचरा पडणार नाही याची काळजी घेतात. प्लास्टिकच्या बाटल्या किनाऱ्यावर फेकल्या जात नाहीत. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत किनाऱ्याच्या स्वच्छतेबाबत सजग बनत आहे. विविध ठिकाणी सुरू झालेल्या कासव संरक्षण मोहिमेतून पर्यावरणविषयक चळवळीलाही बळकटी मिळत आहे.

Web Title: guhagar konkan news tortoise security campaign environment