सिंधुदुर्गात होळीची धूम; पारंपरिक तमाशा सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

कणकवली - सिंधुदुर्गात होळी हा लोकोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होत असताना जिल्ह्यातील जवळपास सार्वजनिक ५०९, तर खासगी ६२१ अशा ११३० ठिकाणी होळ्या उभारून उत्सव साजरा केला जातो. कोकणातील हा शिमगोत्सव म्हणून साजरा होत असताना पारंपरिक तमाशा आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक गावांत ५ ते १५ चालणारा हा लोकोत्सव यंदा मोठ्या आनंदाने साजरा होऊ लागला आहे. 

कणकवली - सिंधुदुर्गात होळी हा लोकोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होत असताना जिल्ह्यातील जवळपास सार्वजनिक ५०९, तर खासगी ६२१ अशा ११३० ठिकाणी होळ्या उभारून उत्सव साजरा केला जातो. कोकणातील हा शिमगोत्सव म्हणून साजरा होत असताना पारंपरिक तमाशा आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक गावांत ५ ते १५ चालणारा हा लोकोत्सव यंदा मोठ्या आनंदाने साजरा होऊ लागला आहे. 

होळी, धूलिवंदन म्हणजेच कोकणात शिमगोत्सव आणि धुळवड म्हणून साजरी केली जाते. सिंधुदुर्गात गावहोळ्या, देवहोळ्या, राखणेहोळ्या उभ्या केल्या जातात. होळीच्या दिवशी आंबा, पोफळी, नारळ, सावर, हेळा अशा विविध झाडांची होळी उभारली जाते. काही ठिकाणी जत्रोत्सवही होतात. पारंपरिक पद्धतीने धार्मिक कार्यक्रम याच होळी उत्सवात केले जातात. या धार्मिक उत्सवातून मानापमानामुळे जिल्ह्यातील ११ गावांत जमावबंदी आदेशही लागू झाला आहे. यंदा होळी रविवारी आल्याने मोठ्या उत्साहात या शिमगोत्वाला सुरवात झाली आहे. होळी उत्सवापासून गुढी पाडव्यापर्यंत सिंधुुदुर्गात तमाशा सुरू होतो. काही ठिकाणी याला मांडही म्हणतात.

पारंपरिक आणि धार्मिक श्रद्धास्थान म्हणून हे मांड भरविले जातात. यातूनच कोकणातील देवरायांपासून घराचा परिसर स्वच्छ ठेवण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. ज्या ठिकाणी होळ्या उभ्या केल्या जातात त्या परिसरात पायातील चप्पलही घालण्यास बंदी असते. होळीच्या मांडावर चप्पल घातली तर शबय मागितली जाते. ज्या कुटुंबात नवजात बालक जन्माला येते त्याच्या नावानेही शबय मागितली जाते. ही परंपरा आजही टिकून आहे. विशेष म्हणजे होळीच्या दिवशी गावागावात अंतर्गत वाद असले तरी याच दिवशी एकमेकांची उणीधुणी काढली जातात. शिमगोत्सवाच्या या उत्सवात कुणी कुणाला प्रत्युत्तर करत नाही. मांडावरील तमाशात लहान मूलही एखाद्या ज्येष्ठाला अपशब्द बोलू शकते, अशी परंपरा आहे. किंबहुना शिव्याही दिल्या जातात. याचा राग मनात धरला जात नाही हे विशेष.

मांडावरील तमाशामध्ये पुरुषच स्त्री वेश परिधान करून नाच करतात. गण, गवळण आणि लावणी डफ तुणतुण्याच्या तालावर गायली जाते. यावे ळी मांडावरील सोंगस हा खरा शिमगोत्सवातील मोठा विरंगुळा असतो. शेतकरी या पाच दिवसांत शेतीतील कुठलेही काम करत नाही किंबहुना कोणतेही शुभ किंवा महत्त्वाचे कामही या पाच दिवसांत टाळले जाते. अशा या शिमगोत्सवाला सिंधुदुर्गात सुरवात झाली असून गावागावांत आनंदाचे वातावरण आहे.

देवगडमध्ये होळीमुळे आनंदाला उधाण
देवगड - तालुक्‍यात यंदा सर्वत्र होळी उत्सव आनंदाने साजरा होत आहे. काही ठिकाणची होळी उत्सवातील मनाई आदेशाची परंपरा महसूल व पोलिस प्रशासनाच्या यशस्वी शिष्टाईने बंद झाली. यामध्ये तहसीलदार वनिता पाटील यांनी पुढाकार घेत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली. यामुळे तालुक्‍यातील एकाही गावात होळीसाठी १४४ कलम लागू केले नसल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली. अलीकडे काही वर्षे तालुक्‍यातील काही गावांमध्ये होळी उत्सवामध्ये मनाई आदेश जारी केले जात होते. 

Web Title: holi celebration in sindhudurg