रुग्णालयात गुटखा विक्रीवरून खडाजंगी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑगस्ट 2016

कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात गुटखाविक्री करणारे रॅकेट कार्यरत असून, त्याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी कोणती कारवाई केली, या प्रश्‍नावरून आजच्या पंचायत समितीच्या सभेत खडाजंगी झाली. अखेर या प्रकरणाची चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सकांना अहवाल पाठविण्यात आला असल्याचे अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी सांगितले. त्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. प्रधानमंत्री आवास योजनेचे निकष आणि वाढत्या महागाईवर शासनाचे सुटलेले नियंत्रण याच्याविरोधात आजच्या सभेत निषेधाचा ठराव करण्यात आला.
 
सभापती आस्था सर्पे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मासिक सर्वसाधारण सभा सकाळी झाली. या वेळी उपसभापती महेश गुरव, गटविकास अधिकारी मुस्ताक गवंडी आदीसह सदस्य, विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.
 
येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या मातांना खासगी दवाखान्यात का पाठविले जाते, असा प्रश्‍न सुरेश सावंत यांनी उपस्थित केला. यावर अधीक्षक श्री. जाधव म्हणाले, ""प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांची संख्या जिल्हा रुग्णालयाच्या तुलनेत अधिक आहे. त्यातच एकच स्त्रीरोगतज्ज्ञ असून, त्यांच्यावर ताण येत आहे. त्यामुळे काही महिला खासगी दवाखान्याकडे जातात. रुग्णालयात डॉक्‍टरांची पदे रिक्त असल्यामुळे आणि ओपीडी दररोज 

तिनशे इतकी असल्याने ताण येत आहे.‘‘
 
उपजिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांकडून गुटखाविक्री केली जाते, असा मुद्दा श्री. सावंत यांनी उपस्थित केला. त्यावर श्री. जाधव म्हणाले, ""रुग्णालयातील ज्या कर्मचाऱ्यावर संशय होता त्याची 22 जुलैला चौकशी करण्यात आली. त्याच्या निवासस्थानावरील गुटखा जप्त करण्यात आला; परंतु तो गुटखाच आहे का, याचा अहवाल अन्न आणि भेसळ प्रशासनाकडून प्राप्त झालेला नाही. तरीही संपूर्ण चौकशी करून आपला अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
 
प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषांमुळे त्यात एकही लाभार्थी बसणार नाही. त्यामुळे गरिबांना पक्की घरे कशी मिळणार, केंद्राने लावलेले हे निकष गरिबांना मारक ठरत असून, महागाईतून होरपळलेली जनता या निकषाने घरकुल बांधूच शकत नाहीत, असे मत व्यक्त करून शासनाविरोधात निषेधाचा ठराव घेण्यात आला. धोकादायक शाळांच्या इमारतीचे निर्लेखन व्हावे, अशी सूचना बाबा वर्देकर यांनी केली. समाजकल्याणच्या शिष्यवृत्ती विभाग, फोंडा परिसरातील धोकादायक पूल आणि रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी बबन हळदिवे यांनी केली. ग्रामपंचायतींना जोडण्यात आलेल्या ओएफसी केबलमुळे पडलेले खड्डे बुचविण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
 
आजच्या सभेला भाग्यलक्ष्मी साटम, मैथिली तेली, राजश्री पवार यांनीही मुद्दे उपस्थित केले.

Web Title: From hospital Gutka sale row