कोकण रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

चिपळूण- गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांची घोषणा झाली. या विशेष गाड्यांनी मुंबईतील चाकरमानी कोकणात येण्यास सुरवात झाली. शुक्रवारी रात्रीपासूनच गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी कोकण रेल्वेला पसंती दिल्याने सर्व गाड्यांना गर्दी उसळली होती. त्यामुळे जीवावर उदार होऊन प्रवास करण्याची वेळ चाकरमान्यांवर आली. मुंबईतील स्थानकांवर गाडीत चढताना होणाऱ्या चेंगराचेंगरीतून लहान मुलांना वाचविताना पालकांची कसरत सुरू होती. यावर उपाय म्हणून रात्रीसाठी पर्यायी गाडीची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांनाही गर्दी उसळली. 225 गणपती स्पेशल गाड्यांची सोय रेल्वेने केली आहे. सावंतवाडी, चिपळूण डेमू, करमाळी, मडगावपर्यंत गणेशोत्सव स्पेशल गाड्या धावत आहेत. नियमित आणि विशेष गाड्यांमध्ये पाय ठेवण्यासाठी जागा मिळत नाही. प्रसंगी चाकरमानी रेल्वेतील शौचालय आणि सामानाच्या डब्यातून प्रवास करत आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून रात्रीच्या 11.05 वाजता सुटणाऱ्या कोकणकन्या एक्‍स्प्रेस आणि रात्री 1.05 वाजता दादर- सावंतवाडी एक्‍स्प्रेसच्या गर्दीत गणेशोत्सवाची भर पडली आहे. अनेक महिला, पुरुषांनी आपल्या मुलांसह काल उभ्याने प्रवास करत कोकण गाठल्याचे सांगितले.

आणखी एक नियमित गाडी हवी
कोकणकन्या व सावंतवाडी या गाड्यांना ठाणे आणि पनवेल येथे राखीव डबे असतात. चिपळूण, रत्नागिरीसाठी वेगवेगळ्या डब्यांचे नियोजन केले जाते. या डब्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी तीन तास लवकर येऊन रांगा लावतात; मात्र गाडी स्थानकावर आल्यानंतर जागा मिळवण्यासाठी चाकरमानी डोक्‍यावर सामान घेऊन पळत सुटतात. गाडीत जागा नसेल तर आतील प्रवासी अनेक वेळा दरवाजाही उघडत नाहीत. अशावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. त्यामुळे रात्रीच्या प्रवासासाठी आणखी एक गाडी नियमित सुरू करायला हवी, अशी मागणी विलास शिंदे यांनी केली.