आरोंदावासीयांचे उपोषण अखेर स्थगित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

सावंतवाडी -आरोंदा येथील वादग्रस्त ठरलेल्या मानसीवाडीच्या बंधाऱ्यावरून ग्रामस्थांनी उपसलेले उपोषणाचे हत्यार काल उशिरा अखेर म्यान करण्यात आले. जोपर्यंत संबंधित बंधाऱ्याला संरक्षक भिंत घालण्यात येत नाही, तोपर्यंत त्यावर डांबरीकरण करण्यात येणार नाही, असे लेखी पत्र खारलॅंड विभागाने उपोषणकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे आता उपोषण स्थगित केल्याचे आंदोलकांनी सांगितले. 

सावंतवाडी -आरोंदा येथील वादग्रस्त ठरलेल्या मानसीवाडीच्या बंधाऱ्यावरून ग्रामस्थांनी उपसलेले उपोषणाचे हत्यार काल उशिरा अखेर म्यान करण्यात आले. जोपर्यंत संबंधित बंधाऱ्याला संरक्षक भिंत घालण्यात येत नाही, तोपर्यंत त्यावर डांबरीकरण करण्यात येणार नाही, असे लेखी पत्र खारलॅंड विभागाने उपोषणकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे आता उपोषण स्थगित केल्याचे आंदोलकांनी सांगितले. 

तालुक्‍यातील आरोंदा या गावातील मानसीवाडी हा परिसर खाडी आणि समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. खाडीचे पाणी शेतात घुसत असल्यामुळे तेथील हजारहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार गेली दहा वर्षे सुरू असून परिसरातील जमीन नापीक झाली आहे. त्या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यावर बांधकाम विभागातर्फे डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते; मात्र संबंधित बंधाऱ्याच्या बाजूला संरक्षक भिंत घातल्याशिवाय डांबरीकरण झाल्यानंतर हा बांध आतून पोखरला जाणार आहे आणि आतापेक्षा जास्त पाणी त्या ठिकाणावरून येणार आहे. त्यामुळे जोपर्यंत संरक्षण कठडा बांधला जात नाही, तोपर्यंत डांबरीकरण करू देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला होता. काल (ता. 29) उपोषणादरम्यान उपस्थित सर्व बांधकाम खारलॅंड, पतन विभाग आणि पोलिसांकडून शिष्टाई करण्याचा प्रयत्न झाला होता; मात्र जोपर्यंत आपल्याला लेखी आश्‍वासन दिले जात नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. 

त्यानुसार ग्रामस्थांच्या मागणीनुसार खारलॅंड विभागाचे कार्यकारी अभियंता वसंत हलोलीकर यांनी आज लेखी पत्र दिले आहे. त्यात संबंधित ठिकाणी संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे; मात्र त्यासाठी मोठा निधी अपेक्षित आहे. त्याबाबतची मागणी आम्ही वरिष्ठ स्तरावर करू तसेच जोपर्यंत निधीची पूर्तता होत नाही तोपर्यंत डांबरीकरण करण्यात येऊ नये अशा सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता अनामिका चव्हाण यांनी पत्र दिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, जोपर्यंत खारलॅंड विभागाकडून संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केल्यांनतर पुढील डांबरीकरणाचे काम हातात घेण्यात येणार आहे. 

विरोधासाठी विरोध नाही 
या वेळी या आंदोलनाचे प्रमुख गोपाळ नाईक म्हणाले, ""आमचा कोणाला विरोध नाही; परंतु त्या बंधाऱ्यावर संरक्षक भिंत बांधण्यापूर्वी डांबरीकरण झाल्यास त्यावरून मोठ्या गाड्या जाणार आहेत. सद्य:स्थिती अस्तित्वात असलेला बंधारा हा केवळ मातीचा आहे. त्यामुळे त्याला तडे जाऊन लोकंच्या शेतीत पाणी घुसणार असून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आम्ही विरोधासाठी विरोध न करता केवळ दोन्ही गोष्टी एकाच वेळी पूर्ण व्हाव्यात, अशी आमची प्रमुख मागणी आहे.'' 

Web Title: The hunger strike postponed

टॅग्स