आचरेकरांना पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेतल्यास विरोध 

आचरेकरांना पालिकेच्या निर्णय प्रक्रियेत सामावून घेतल्यास विरोध 

मालवण - माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना भाजपने पक्षात घेणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. भाजपला पक्ष म्हणून जो निर्णय घ्यायचा आहे तो ते घेऊ शकतात. त्याला आमचा आक्षेप नाही; मात्र शिवसेना, भाजपने स्थापन केलेल्या गटात तसेच निर्णय प्रक्रियेत त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आमचा प्रखर विरोध राहील, असे शिवसेना प्रचार समितीप्रमुख नितीन वाळके यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

येथील हॉटेल चैतन्य येथे पत्रकार परिषद झाली. या वेळी बांधकाम सभापती सेजल परब, महिला बालकल्याण सभापती तृप्ती मयेकर, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, तुळशीदास मयेकर, तपस्वी मयेकर उपस्थित होते. 

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची भूमिका श्री. वाळके यांनी मांडली. या वेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या बैठकीसाठी मुंबईत गेल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच शिवसेनेच्या या भूमिकेस आपला पाठिंबा असल्याचे नगरसेवक पंकज सादये यांनी स्पष्ट केले. नुकतीच झालेली पालिका निवडणूक शिवसेना-भाजपतर्फे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या विरोधातच लढविण्यात आली होती. प्रस्थापितांच्या विरोधात जनतेच्या भावना असल्यानेच या निवडणुकीत शहरवासीयांनी शिवसेना-भाजपला आपला कौल दिला आहे. असे असताना जनतेने ज्यांना नाकारले त्यांना पक्षात घ्यावे, की न घ्यावे हा भाजपचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. भाजपच्या निर्णयाला आमचा आक्षेप नाही; मात्र पालिकेत युतीचा दहा जणांचा गट स्थापन करण्यात आलेला आहे. या गटात आणि निर्णय प्रक्रियेत आचरेकर यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला गेल्यास त्याला आमचा प्रखर विरोध राहील. 

शिवसेना-भाजपच्या गटामध्ये शिवसेनेचे सहा, तसेच भाजपच्या चार सदस्यांचा सहभाग आहे. या वेळी शहरात पालिकेच्या माध्यमातून एलइडी दिवे बसविण्याची कार्यवाही केव्हा होणार, अशी विचारणा केली असता पालिकेने निविदा मंजूर करताना संबंधित ठेकेदाराला ज्या अटी घातल्या होत्या त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. त्यामुळे हे दिवे बसविण्याची कार्यवाही झालेली नाही. शहरात सद्यःस्थितीत सुरू असलेली पथदिव्यांची व्यवस्था सुरळीत कशी राहील यादृष्टीने आवश्‍यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. जनतेला कोणताही त्रास होऊ नये याची दक्षताही घेतली जात आहे. शहरातील भुयारी गटार योजनेच्याच ठेकेदाराकडून खचलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यावर एकही रुपया पालिकेचा खर्च झालेला नाही. रस्त्याच्या कामासंदर्भात ज्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या, त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत आणि त्यापूर्वीही ज्यांनी गैरकारभार केला त्यांच्या पदरातच त्यांचे माप टाकण्याची कार्यवाही येत्या काळात केली जाणार आहे, असेही श्री. वाळके यांनी या वेळी स्पष्ट केले. 

भाजपने सुदेश आचरेकर यांना पक्षात प्रवेश दिला तरी आम्ही त्यांना गटात तसेच निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करू देणार नाही. पालिका निवडणुकीत शहरवासीयांनी आचरेकर यांच्या विरोधात कौल दिला आहे. त्यामुळे ज्यांना जनतेने नाकारले आहे अशा व्यक्तीस पुन्हा जनतेवर लादणे योग्य नाही. गटनेतेपद भाजपकडे असले तरी आतापर्यंत बहुमतानेच सर्व निर्णय झालेले आहेत. गटनेते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नाहीत. गटात जे निर्णय घेतले जातील ते बहुमतानेच घेतले जातील आणि त्यानुसारच अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे येत्या काळातही गटाचे निर्णय हे बहुमतानेच होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. 
- नितीन वाळके, प्रचार समिती प्रमुख, शिवसेना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com