आरोग्य यंत्रणा सुधारासाठी पत्रकार सरसावले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा रुग्णालयाकडून सर्वसामान्य गरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळेनाशी झाली आहे. प्रत्येक रुग्णाला उपचाराविना बाहेरचा रस्ता दाखविला जातो. डॉक्‍टरांची अनेक वर्षे रिक्त असलेली पदे आणि बंद पडलेली अत्यावश्‍यक यंत्रणा याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील आरोग्य सेवाच पूर्णपणे ढासळली आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले. 

जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून जनतेच्या आरोग्य सेवेबाबत हतबलता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक रुग्णाला तज्ज्ञ डॉक्‍टर व आवश्‍यक सुविधा नसल्याचे कारण पुढे करून गोवा-बांबुळी किंवा कोल्हापूरसारख्या लांबच्या ठिकाणी उपचारासाठी पाठविले जाते. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा रुग्णालयाची सुसज्ज इमारत असूनही तेथे जनतेला आवश्‍यक आरोग्य सेवा दिली जात नाही. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांनाही प्रसूतीसाठी अन्य ठिकाणी पाठविले जात आहे. एकूणच जिल्हा रुग्णालयाची आरोग्य सेवेबाबतची प्रतिमा ढासळली आहे. यामुळे जनतेमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा, अनेक वर्षे रिक्त असलेली तज्ज्ञ डॉक्‍टरांची पदे तत्काळ भरावीत, बंद पडलेल्या अत्याधुनिक व अत्यावश्‍यक यंत्रणा सुरू कराव्यात, जिल्हा रुग्णालयाच्या कारभारात सुसूत्रता आणावी याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी चौधरी यांचे लक्ष वेधण्यात आले. मुख्यमंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. या वेळी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गावडे, उपाध्यक्ष नंदकुमार आयरे, सचिव संजय वालावलकर, दिलीप ऊर्फ बाळ खडपकर, देवयानी वरसकर, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद दळवी, गिरीश परब, मनोज वारंग, तेजस्वी काळसेकर, सतीश हरमलकर आदी जिल्हा मुख्यालयातील पत्रकार उपस्थित होते. 

जनआंदोलनाचा इशारा 
जिल्हा रुग्णालयातील ढासळलेली रुग्णसेवा आणि आवश्‍यक सोयीसुविधा व रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने दखल घ्यावी, अन्यथा नाईलाजास्तव येथील जनतेच्या समस्येसाठी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या पुढाकाराने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे. 

Web Title: Improve the health system