आधी ऊस क्षेत्र वाढवा - सतीश सावंत

आधी ऊस क्षेत्र वाढवा - सतीश सावंत

कणकवली - जिल्हा बॅंकेच्या अटी, शर्ती पूर्ण करून नाबार्ड आणि राज्य बॅंकेच्या शिफारशीनंतर विजय सावंत यांच्या साखर कारखान्याला कर्ज देण्यास आमची कोणतीही हरकत नाही; मात्र हा कारखाना चालण्यासाठी साडेतीन लाख टन उसाचे उत्पादन जिल्ह्यात निर्माण व्हावे यासाठी त्यांनी प्रथम प्रयत्न करावा, तसेच राणे द्वेष आणि राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू केला तर आमचे सहकार्य त्यांना मिळेल, असे बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

विजय सावंत यांनी जिल्हा बॅंक कर्ज देण्यास असमर्थ आहे, त्यांच्याकडे साधा अर्जही नाही, अशी टीका केली होती. याला उत्तर देताना श्री. सावंत म्हणाले, ‘‘विजय सावंत हे जिल्हा बॅंकेबाबत गैरसमज पसरवत आहेत. त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, काही संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीही उपस्थित होते. या चर्चेत स्पष्ट केले होते की, तुमची कंपनी बॅंकेच्या अटी पूर्ण करत असेल तर कर्ज देण्यास हरकत नाही; मात्र नाबार्ड आणि राज्य शिखर बॅंकेची तुमच्या प्रस्तावाला मान्यता मिळणे गरजेचे आहे; मात्र विजय ॲग्रो कंपनीचे जिल्हा बॅंकेत खातेही नाही, कंपनीच्या नावे ब वर्ग सभासद खातेदारही नाही. ज्यांना कर्ज देणार त्यांनी या अटीची पूर्तता का केली नाही? यामुळे त्यांनी कारखान्याचा आसरा घेऊन राजकारण करणे थांबवावे. त्यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता आहे. त्यांचे खाते राष्ट्रीयीकृत बॅंकेत असताना त्यांना त्या बॅंका का कर्ज देत नाही याचा विचार करावा लागणार आहे. खरंच साखर कारखाना काढण्याची तळमळ असती तर त्यांना कारखान्यासाठी मान्यता मिळाली त्या वेळेपासून त्यांनी जिल्हात उस लागवडीसाठी का प्रयत्न केले नाहीत. उस लागवडीसाठी त्यांच्याकडील कोणतीही उपाय योजना झालेला नाही. केवळ राजकरण करायचे असा एककलमी कार्यक्रम विजय सावंत यांनी राबवला आहे.

आमदार नितेश राणे यांनी एक पाऊल मागे घेत जिल्हा बॅंकेला सावंताच्या साखर कारखाना कर्ज देण्यासाठीचे पत्र दिले. त्याचा आदर करून आम्ही विजय सावंत यांच्यासह त्यांच्या संचालकाशी चर्चा केली. या चर्चेतही काही राजकारण सोडून लोक हितासाठी काम करण्यास आम्ही तयारी दर्शवली. मात्र केवळ राणे व्हेंन्चर्सच्या द्वेषापोटी विजय सावंत राजकारण करून दिशाभुल करीत आहेत ते प्रथम थांबवावे.’’ 

धरणांचे काय झाले ?
श्री. सावंत म्हणाले, ‘‘कारखान्याचे राजकारण करणाऱ्या विजय सावंत यांनी यापुर्वी अनेकदा जनेतीच दिशाभूल केली आहे. जिल्हात छोटी धरणे उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी आणला होता; मात्र गेल्या चार वर्षात त्यांच्या प्रयत्नाने एकही धरण प्रकल्प पुर्ण झाला नाही किंवा अस्तित्वात आला नाही केवळ जनतेला फसवण्याचे काम त्यांनी करू नये.’’

प्रोजेक्‍ट रिपार्ट नाही
श्री. सावंत म्हणाले,‘‘जिल्हा बॅंकेकडे कर्ज मागत असताना तसा प्रकल्प अहवाल विजय ॲग्रो तर्फे देण्यात आलेला नाही. जर कारखाना सुरू करायचा होता. तर तसा परिपुर्ण प्रस्ताव का पाठवला नाही. जर प्रस्ताव आला असता तर तो संचालक मंडळात मान्यता देवून तो प्रस्ताव नाबार्ड आणि राज्य शिखर बॅंकेकडे मान्यतेसाठी आम्ही पाठविला असता.’’ 

२५ वर्षे आमदारकीनंतर कोण कर्ज देत नाही
श्री. सावंत म्हणाले, ‘‘विजय सावंत यांनी गेली २५ वर्षे आमदारकी उपभोगली आहे. त्यांना कोण कर्ज देणार नाही. त्यांची तशी पत आहे, तर राष्ट्रीयीकृत बॅंक त्यांना का कर्ज देत नाही? कारखाना उभारण्याचे प्रामाणिक प्रयत्न असते तर त्यांना कोणीही कर्ज देऊ शकते; मात्र १५० कोटी कर्ज देताना किमान चार बॅंकांचा सहभाग असतो आणि ते ठरवतील ती मुख्य बॅंक म्हणून त्यांच्या कारखान्याला कर्ज देण्यात तयार होणार आहे. पण खासगी कंपनीसाठी बॅंकांच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत, त्या सहकारी बॅंक म्हणून आम्हालाही आहेत. त्यांच्या प्रस्तावाला राज्य शिखर बॅंक मान्यता देते ही वस्तुस्थिती आहे.’’

‘त्‍यांच्‍या’वर विश्‍वास नाही
श्री. सावंत म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या काळात साखर कारखान्याचे भांडवल करून दहा हजार बेरोजगारांना नोकरी देतो असे सांगत अर्ज मागवले; मात्र निवडणुकीत त्यांना चार हजार मते मिळाली. याचे कारण बेरोजगारांच्या कुटुंबांनीही त्यांच्यावर विश्‍वास दाखवला नाही ही वस्तुस्थिती आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com