लाचखोरीत महसूलचे पाय खोलात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

रत्नागिरी - जिल्ह्यात महसूल विभागाचा लाचखोरीमध्ये खोल पाय रुतत चालला आहे. दरवरर्षी महसूल विभाग लाचखोरीत अग्रेसर असतो. गेल्यावर्षीही हे रेकॉर्ड कायम आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात 12 लाचखोरांना पकडण्यात आले. त्यामध्ये महसूल विभागाचे सातजण होते. उर्वरित पोलिस, जिल्हा परिषद, दुय्यम निबंधक आदींचा समावेश आहे. यापैकी दोघांना शिक्षा झाल्याने लाचखोरीला काही प्रमाणात चाप बसला आहे.

लाचलुचपत विभागाने जनजागृती केल्याने नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. 2016 मध्ये 12 शासकीय कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले. वाशीतर्फे देवरूखचे तलाठी सुरेश जाधव यांना चार हजारांची लाच घेताना पकडले होते. सात-बारा उताऱ्यांवर वारसांची नोंद करण्यासाठी लाच मागितली होती. मंडणगड ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी प्रभाकर भावठानकर यांनी रुग्णाला डिस्चार्ज देण्यासाठी 500 रुपये, दाभोळ सागरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग लक्ष्मण चव्हाण यांनी अटकपूर्व जामीन रद्द करण्याची धमकी देऊन तक्रारदाराकडे 35 हजार, पालगड तलाठी संजय गावकर यांनी वारस तपास फेरफार उतारा देण्यासाठी 20 हजार, गुहागर तलाठी गजानन महादेव धावडे यांनीही वारस तपास होऊन त्यांची नावे सात-बारा उताऱ्यावर व दप्तरी नोंदविण्यासाठी पैसे मागितले होते. शिक्षण विभागातील कनिष्ठ लेखापरीक्षक शीतल माळवदे यांनी वरिष्ठ श्रेणी मंजूर झाल्यानंतर तक्रारदारांना सेवा पुस्तकाची पडताळणी करून देण्यासाठी दीड हजार, कनिष्ठ लेखापरीक्षक महेंद्र देवीदास नेवे यांनी ऑडिटचे प्रतिकूल मुद्दे घालवून टाकण्यासाठी वीस हजार, खेड तहसीलमधील कनिष्ठ लिपिक वसंत गर्जे यांनी तक्रारदार विरोधात वॉरंट न काढणे व हजेरी माफ करण्यासाठी दीड हजार, बीजघरचे तलाठी अंजली राजू जाधव यांनी शेतातील लाकडे तोडल्याप्रकरणी पंचयादी करून कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली. दुय्यम निबंधक चंद्रकांत तुकाराम आंबेकर, एजंट नितीन नामदेव मोरे यांनी जमिनी खरेदीखताची दस्त नोंदणी करण्यासाठी 20 हजारांची लाच मागितली. करबुडे तलाठी चंद्रकांत गणू आगरे यांनी जमीन खरेदीखताची नोंद सात-बाराला करण्यासाठी चार हजार रुपये मागितले. त्यांना दोन हजार रुपये घेताना पकडण्यात आले. आकले येथील तलाठी गणेश अरविंद सुर्वे यांनी वारस तपासणी करून नाव दप्तरी नोंदण्यासाठी 12 हजारांची लाच मागितली होती. त्यांना सहा हजार रुपये घेताना पकडण्यात आले.