सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली ?

सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्प गुंडाळण्याच्या हालचाली ?

सावंतवाडी - सिंधुदुर्गाच्या पर्यटनविकासासाठीचा ड्रीम प्रोजेक्‍ट मानल्या जाणाऱ्या सी वर्ल्डच्या उभारणीबाबत राज्याकडून हालचाली मंदावल्या आहेत. हा प्रकल्प गुंडाळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

साधारण २००७ पासून सी वर्ल्ड प्रकल्पाची कुणकुण लागली. राज्याकडून असा प्रकल्प साकारण्यासाठी मुंबईसह कोकणातील विविध ठिकाणे तपासण्यात आली. यात हा प्रकल्प सिंधुदुर्गातील तोंडवली, वायंगणी या गावांमध्ये राबवण्याचे निश्‍चित झाले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत याचे १८ ऑक्‍टोबर २०११ रोजी सादरीकरण झाले. तेव्हापासून याला खरी गती आली. 

हा अशा पद्धतीचा आशिया खंडातील पहिलाच प्रकल्प ठरणार होता. दरवर्षी दहा लाख पर्यटकांचे उद्दिष्ट ठेवून याची उभारणी केली जाणार होती. सुरवातीला १३९० एकरमध्ये प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते; मात्र इतकी जमीन संपादित करण्यास स्थानिकांचा प्रचंड विरोध झाला. त्यामुळे हा प्रकल्प वादात सापडला.

आघाडी सरकार जाऊन युतीची सत्ता आली. त्यामुळे जुन्या सरकारचा हा प्रकल्प पुढे जाण्याची शक्‍यता धूसर होती; मात्र पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणारा हा प्रकल्प टाळणे सत्ताधाऱ्यांना सोपे नव्हते. साहजिकच नव्याने अभ्यास करण्यात आला. यात १३९० एकरांवरील हा प्रकल्प ३५० एकरांमध्ये बसू शकतो, असा निष्कर्ष काढला गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रकल्पासाठी विशेष आग्रही होते. भूमिपुत्र प्रकल्प साडेतीनशे एकरांवर आला, तरी आपल्या विरोधाच्या भूमिकेवर ठाम राहिले. यामुळे प्रकल्पातील अडचणी वाढत गेल्या.

हा प्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर राबविला जात आहे. अशावेळी भूसंपादन झाल्यानंतर ग्लोबल निविदा काढल्या जातात. यानंतर गुंतवणूकदारांना पाचारण केले जाते; मात्र अशा मोठ्या प्रकल्पांसाठी गुंतवणूकदार व्यक्ती किंवा संस्था यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रक्रियेआधीच काही गुंतवणूकदार पडद्यामागे तयार असतात. या प्रकल्पाच्या बाबतीत एकूण कारभार पाहून असे पडद्यामागच्या काही मोठ्या गुंतवणूकदारांचे यातील स्वारस्य निघून गेल्याचे समजते.

आता हा प्रकल्प राज्याकडून गुंडाळला जाण्याची शक्‍यता आहे. यावर उघडपणे कोणी बोलत नसले, तरी सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला नवी झळाळी देणाऱ्या या प्रकल्पाचे भवितव्य अनिश्‍चिततेत अडकले आहे.

हा प्रकल्प व्हावा, यासाठी शासनाचे सर्व दरवाजे ठोठावले. या प्रकल्पक्षेत्रात माझी स्वतःची जमीन असून माझ्यासह अन्य काही जण जमिनी द्यायला तयार होते; पण सरकारी यंत्रणा या प्रकल्पाबाबत सकारात्मक नाही. यामुळे हा प्रकल्प जवळपास गुंडाळल्यात जमा आहे.
 - श्रीराम पेडणेकर,
लॅण्ड होल्डर

सी-वर्ल्ड दृष्टिक्षेपात
* २००७ मध्ये प्रकल्पाची घोषणा
* २४ जून २००९ ला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
* १८ ऑक्‍टोबर २०११ ला मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण
* २०१३-१४ च्या अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतूद
* २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सी वर्ल्डचा उल्लेख
* युती सरकारकडून कमी जागेत प्रकल्प बसविण्याची घोषणा
* २०१७ च्या व्हिजिट महाराष्ट्र इअरमध्ये ‘सी वर्ल्ड’चा समावेश
* ५०९ कोटी खर्चाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
* २० हजार लोकांना मिळणार होता रोजगार
* १० वर्षांत प्रकल्पातून मिळणार होते ३०० कोटींचे उत्पन्न
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com