भास्कर जाधव यांनी शिवसेनेला केली मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

चिपळूण ः राष्ट्रवादी कॉंग्रेसवर प्रचंड निष्ठा आहे, असे सांगणारे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली, असा आरोप राष्ट्रवादीची चिपळूण पालिकेच्या निवडणुकीची सूत्रे हाती असलेले रमेश कदम यांनी केला.

रमेश कदम आणि भास्कर जाधव यांच्यातील जाहीर वादाने निवडणुकीआधी राष्ट्रवादीतील वातावरण कलुषित झाले होते. जाधव यांचे सहकारी शिवसेनेला जाऊन मिळाले होते; मात्र याबाबत आतापर्यंत कदम यांनी मौन पाळले होते.

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात रमेश कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर थेट आरोप केला. पत्रकारांना ते म्हणाले, की जाधव यांना राष्ट्रवादीचे काम करायचे नव्हते, तर त्यांनी शांत बसायला हवे होते. गप्प बसल्याचे फक्त दाखवायचे आणि शिवसेनेला मदत करायची ही त्यांची कृती पक्षासाठी घातक आहे. जाधव यांनी शिवसेनेला मदत केली असली, तरी राष्ट्रवादीच सत्ता काबीज करील. भास्कर जाधव यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली. आमच्या विरोधात सर्वच पक्ष होते. सर्वांनीच माझ्यावर टीका करण्यात धन्यता मानली. कोणीही काहीही केले तरी राष्ट्रवादीचाच विजय होणार आहे. ही लढाई माझ्या अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे हा विजय मी मिळवणारच. आमची साऱ्यांची बांधिलकी राष्ट्रवादीशी आहे.

चिपळूण पालिका निवडणुकीची सूत्रे माझ्याकडे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिली. दूरध्वनीवरून त्यांनी तसे सांगितले. असे जाहीर करून उमेदवार निवडीपासून ते पार्लमेंटरी बोर्ड जाहीर करण्यापर्यंतचे सारे निर्णय कदम यांनी एकामागोमाग एक घेतल्यामुळे भास्कर जाधव अस्वस्थ होते. ते चिपळूण निवडणुकीपासून दूर राहिले. त्यांचे शिलेदार आणि शहर विकास आघाडीतील नगरसेवक शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे जाधव यांची फौज शिवसेनेच्या मदतीला गेल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाधव यांच्याबाबत कोणताही शब्द रमेश कदम आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी काढला नाही; मात्र निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भास्कर जाधव यांनी शिवसेनेला मदत केल्याचेच थेटपणे सांगून कदम यांनी जाधव यांना अडचणीत आणले आहे.