नेत्रदीपक दिंडीने जलसंवर्धनाचा नारा घुमला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

चिपळूण - आजपासून सुरू झालेल्या जलसाहित्य संमेलनानिमित्त देशातील विविध नद्यांचे पाणी असलेल्या जलकुंभांसह निघालेल्या दिंडीने शहर रंगीबेरंगी होऊन गेले. शहरातील विविध विद्यालय, महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला मंडळांनी या दिंडीला नेत्रदीपक रूप दिले होते. अशा तऱ्हेने जलसंवर्धनाचा नाराही चिपळुणात घुमला. झांज व लेझीम पथकांनी दिंडी नादमयही झाली होती. 

चिपळूण - आजपासून सुरू झालेल्या जलसाहित्य संमेलनानिमित्त देशातील विविध नद्यांचे पाणी असलेल्या जलकुंभांसह निघालेल्या दिंडीने शहर रंगीबेरंगी होऊन गेले. शहरातील विविध विद्यालय, महाविद्यालये, सामाजिक संस्था, महिला मंडळांनी या दिंडीला नेत्रदीपक रूप दिले होते. अशा तऱ्हेने जलसंवर्धनाचा नाराही चिपळुणात घुमला. झांज व लेझीम पथकांनी दिंडी नादमयही झाली होती. 

येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने शहरातील ब्राह्मण सहायक संघ व विरेश्‍वर तलाव परिसरात जलसाहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. जलसाहित्य संमेलनानिमित्त आज सकाळी ९ वाजता शहरातून जलदिंडी काढण्यात आली. वाचनालयासमोर ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांच्या हस्ते जलदिंडीचे उद्‌घाटन झाले. भारत व उपखंडातील नद्या, सरोवरे, तलावातील पाणी असलेले २५ जलकुंभ आणण्यात आले होते. हे जलकुंभ घेऊन २५ सुवासिनी जलदिंडीत सहभागी झाल्या होत्या. वाचनालयापासून जुना भैरी मंदिर, चिंच नाका, भोंगाळे, मध्यवर्ती बस स्थानकमार्गे ब्राह्मण सहायक संघात जलदिंडी पोचली. दिंडीप्रमुख शिवाजी शिंदे व वाचनालयाचे संचालक व विविध संस्था पदाधिकाऱ्यांनी दिडींचे नेटके नियोजन केले होते. पाण्याची बचत, जलसंवर्धन, पाणी आडवा, पाणी जिरवा, पाणी म्हणजे जीवन आदी माहिती देणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते. जलसंवर्धनासाठी  विविध घोषणाही देण्यात आल्या. संमेलन ठिकाणी दुर्मिळ वस्तूंचे कलादालन साकारले आहे. त्याचे उद्‌घाटन अंजली शारंगपाणी यांच्याहस्ते झाले. 

शहरातील परांजपे मोतीवाले हायस्कूल, युनायटेड इंग्लिश स्कूल, बांदल इंग्लिश मीडियम स्कूलचे झांजपथक व लेझीम पथक सहभागी झाले होते. परशुराम येथील एम.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलने जलचर देखावा साकारला होता. पेढे येथील आर. सी. काळे विद्यालयाचे एमसीसी पथक, माता रमाई व आनंदराव पवार महाविद्यालयाचे लेझीम पथक, डीबीजे महाविद्यालयाचा सुवासिनी ग्रुप, पाग कन्या शाळेचे हरित सेना पथक, पाग मुलांची शाळा, ग्लोबल चिपळूण टुरिझम यांच्यासह विविध संस्था, महिला मंडळाचे ॲव्हिट ग्रुप, स्नेहवर्धिनी, परिमल ग्रुप यांच्यासह महिला मंडळे, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी वाचनालयाचे सर्व संचालक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, उपाध्यक्ष बापू काणे, संचालक व कवी अरुण इंगवले, सुनील कुलकर्णी, कैसर देसाई, नगरसेविका सौ. सीमा रानडे, लेखक श्रीराम दुर्गे, श्री. केतकर सर, प्रा. स्वरदा कुलकर्णी, सौ. सोनाली खर्चे, राम रेडीज, महमंद झारे, कवी राष्ट्रपाल सावंत यांच्यासह विविध मान्यवर, डीबीजे महाविद्यालयातील प्राध्यापक, माध्यमिक विद्यालयांचे शिक्षक, साहित्यप्रेमी उपस्थित होते.