काळबादेवी किनाऱ्यावरील स्मशानभूमी वाहून गेली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

"यंदा उधाणाची तीव्रता जास्त आहे. नव्या बंधाऱ्यावरून लाटांचे पाणी जात आहे. बंधारा नसलेल्या भागातील वाळू लाटांबरोबर पुन्हा समुद्रात जात आहे. त्यावर वेळीच आळा घालण्याची गरज आहे; अन्यथा खाडी व समुद्राच्या मधोमध वसलेल्या काळबादेवी ग्रामस्थांना धोका आहे.‘‘
- राजू पारकर, ग्रामस्थ. 

रत्नागिरी- तीन दिवसांत काळबादेवी किनाऱ्यावर समुद्राने अतिक्रमण केले असून, येथील स्मशानभूमी वाहून जाण्याची भीती आहे. येथे आठशे मीटर बंधाऱ्याचे उर्वरित काम पूर्ण व्हावे, यासाठी काळबादेवी ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे; मात्र त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. 

काळबादेवीच्या तिन्ही बाजूला खाडी व समुद्राचा भाग आहे. दरवर्षी उधाणामुळे किनाऱ्याची धूप होते. त्याला आळा घालण्यासाठी आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नाने पीर दर्गा ते पारकरवाडीपर्यंत आठशे मीटरचा बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे यावर्षीच्या पहिल्या मोठ्या उधाणाचा परिणाम येथील पारकरवाडीपर्यंतच्या ग्रामस्थांना जाणवला नाही; परंतु त्यापुढील भागातील किनाऱ्याची धूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. येथील स्मशानभूमीची एक शेड वाहूनही गेली आहे. या किनारी भागात शेट्येवाडी, पाटीलवाडी, बनपवाडीचा भाग येतो.