जिल्ह्यात हजारो चाकरमानी दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

कणकवली - गणेशोत्सव सण उत्साहात साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गात चाकरमान्यांचा ओघ सुरू झाला आहे. आज दिवसभरात सहा गणेशोत्सव विशेष गाड्यांसह इतर नियमित रेल्वे गाड्यातून हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले. खासगी गाड्यांतूनही चाकरमानी दाखल होत असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

कणकवली - गणेशोत्सव सण उत्साहात साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गात चाकरमान्यांचा ओघ सुरू झाला आहे. आज दिवसभरात सहा गणेशोत्सव विशेष गाड्यांसह इतर नियमित रेल्वे गाड्यातून हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले. खासगी गाड्यांतूनही चाकरमानी दाखल होत असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

चाकरमान्यांच्या आगमनामुळे रेंगाळलेला वाहतूक व्यवसाय तेजीत आला आहे. तसेच गावोगावी चाकरमानी दाखल होत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांतील वर्दळ वाढली आहे. पुढील दोन दिवसांत चाकरमान्यांचा ओढ आणखी वाढणार आहे. कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने यंदा २४० विशेष गाड्यांची व्यवस्था केली असून १९ ऑगस्ट पासून या जादा गाड्या धावू लागल्या आहेत. याखेरीज एस.टी. बसेसच्या माध्यमातूनही चाकरमानी जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. मुंबईहून सिंधुदुर्गात येण्यासाठी सुमारे दोनशे बसेसचे बुकिंग झाले आहे.  

आज दुपारपर्यंत अहमदाबाद-करमळी, सीएसटी-करमळी, दादर-सावंतवाडी स्पेशल, मनमाड-करमळी स्पेशल, पुणे-सावंतवाडी स्पेशल, बांद्रा टर्मिनस-सावंतवाडी स्पेशल  अशा सहा गणेशोत्सव विशेष गाड्या दाखल झाल्या यातून हजारो चाकरमान्यांनी मुंबईतून आणलेल्या साहित्यासह आपल्या गावाकडे धाव घेतली होती. याखेरीज नियमित धावणारी मांडवी एक्‍स्प्रेस, जनशताब्दी एक्‍स्प्रेस, दिवा पॅसेंजर, कोकणकन्या, तुतारी एक्‍स्प्रेस या रेल्वे गाड्यांतून देखील हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले.

कोकणात यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. तसेच कोकण रेल्वे प्रशासनाच्या दक्षतेमुळे रेल्वे मार्ग निर्धोक राहिला आहे.  कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी आहे. यात नियमित गाड्यांसह गणेशोत्सव विशेष गाड्यांचा भार असल्याने सर्वच रेल्वे गाड्या सध्या दीड ते दोन तास विलंबाने धावत आहेत. 

रेल्वे वाहतुकीबरोबर खासगी वाहनांतूनही मुंबईकर चाकरमानी जिल्ह्यात येत असल्याने त्याचा ताण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आला आहे. यात शहरांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार होत आहेत. ही कोंडी टाळण्यासाठी महामार्गावर जादा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. शहरात पटवर्धन चौक ते बसस्थानक आणि पटवर्धन चौक ते पोलिस ठाणे या भागात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जादा पोलिस बंदोबस्त आहे. 

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून चाकरमानी येण्यास सुरवात झाली असली तरी आजपासून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठांनाही चालना मिळाली आहे. पूर्वी गणेशोत्सवाची मोठी खरेदी मुंबईतूनच होत असे. मात्र आता गावाकडच्या दरात फारशी तफावत नसल्याने मोठी खरेदी गावातच केली जाते. चाकरमान्यांच्या आगमनामुळे आज बाजारपेठाही गजबजू लागल्या आहेत. तसेच रिक्षा, टेम्पो आदी वाहतूक व्यवसायालाही चालना मिळाली आहे.  

रेल्वे स्थानकात बंदोबस्त वाढविला
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने जादा गाड्या सोडल्या आहेत. यातून लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. याखेरीज सर्व रेल्वे गाड्यांतही सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिस विभागाकडून देण्यात आली. सद्यःस्थितीत रेल्वे पोलिस बलाचे नियमित कर्मचारी, ८० जवानांचा समावेश असलेली स्पेशल फोर्सची तुकडी तसेच १०० होमगार्ड जिल्ह्यातील स्थानकात आहेत. 

रेल्वे दोन ते अडीच तास विलंबाने
कोकण रेल्वे मार्गावर अहमदाबाद-करमळी, सीएसटी-करमळी, दादर-सावंतवाडी स्पेशल, मनमाड-करमळी स्पेशल, पुणे-सावंतवाडी स्पेशल, बांद्रा टर्मिनस-सावंतवाडी, सीएसटी-मडगाव अशा जादा गणेशोत्सव फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. रेल्वे मार्ग एकेरी असल्याने या जादा गाड्यांचा ताण कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर आला असून आज सर्वच गणेशोत्सव स्पेशल गाड्या तसेच कोकणकन्या एक्‍स्प्रेस, मांडवी एक्‍स्प्रेस, तुतारी एक्‍स्प्रेस, जनशताब्दी या नियमित गाड्यादेखील दोन ते अडीच तास विलंबाने धावत होत्या.