स्वागतासाठी सजल्या बाजारपेठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

खरेदीसाठी मोठी गर्दी - फळबाजार तेजीत; हॉटेल फुल्ल
कणकवली - गणरायांच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने आज शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. यात सजावटीचे साहित्य, किराणा साहित्य, फळ बाजार, विद्युत तोरणे आदींचा बाजार तेजीत होता. तसेच प्रत्येक वस्तूला महागाईची झळ बसल्याचीही चर्चा ग्राहकांत होती.

खरेदीसाठी मोठी गर्दी - फळबाजार तेजीत; हॉटेल फुल्ल
कणकवली - गणरायांच्या आगमनासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने आज शहरातील बाजारपेठांत खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. यात सजावटीचे साहित्य, किराणा साहित्य, फळ बाजार, विद्युत तोरणे आदींचा बाजार तेजीत होता. तसेच प्रत्येक वस्तूला महागाईची झळ बसल्याचीही चर्चा ग्राहकांत होती.

गुरुवारी (ता. २४)  हरितालिका व्रतापासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. हरितालिकेसाठी नारळाची शहाळी महत्त्वाची असल्याने किनारपट्टी तसेच केरळ, कर्नाटक येथून आलेल्या शहाळ्यांनी आज बाजारपेठ व्यापली होती. एका शहाळ्यासाठी पंचवीस ते तीस रुपये दर लावला जात होता.  श्रावण महिन्यात वाढलेले फळांचे दरही चढेच राहिले आहेत. सफरचंद, मोसंबी, डाळिंब यांचे दर सरासरी शंभर ते दोनशे रुपये किलो एवढे होते. चांगली केळी पन्नास तर इतर केळी चाळीस रुपये डझनानेच घ्यावी लागत होती. तांदूळ, 

विविध प्रकारच्या डाळी, वाटाणे, शेंगतेल, पामतेल तसेच विविध कडधान्ये आदींना मोठी मागणी आहे. श्रीगणरायांच्या सजावटीसाठी कापड विक्रेत्यांनी विविध प्रकारचे पडदे उपलब्ध केले असून, त्यासाठीची चोखंदळ खरेदी ग्राहकांतून केली जात होती. याखेरीज विद्युत रोषणाईच्या दुकाने देखील गर्दीने फुल्ल होती. समई, पंचारती यांचा समावेश असलेली भांड्याची दुकाने, विविध प्रकारची कपड्यांची दुकानांमध्ये गर्दी होती. मोबाईल आणि इलेक्‍ट्रॉनिक दुकानांमध्ये सेल असल्याने तेथेही ग्राहकांचा रेटा होता.

याखेरीज भजनांसाठी लागणाऱ्या तबला-मृदुंगाच्या दुकानांमध्ये कामे हातावेगळे करण्यात पंढरपूरहून पोटासाठी आलेली कुटुंबे दिवस रात्र मेहनत घेताना दिसत होते. गणरायांच्या आरती आणि भजनानंतर होणाऱ्या प्रसादासाठी  सफरचंद, केळी, चिबूड, काकडी, पेढे, लाडू आदींची खरेदी चाकरमान्यांकडून सुरू होती.

उलाढाल वाढली
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या संख्येने मुंबईहून प्रवासी दाखल होऊ लागले आहेत. यंदा रेल्वे प्रशासनाने जादा रेल्वेगाड्या सोडल्याने प्रवाशांनी सोय झाली.  गेल्या दोन दिवसांत हजारो चाकरमानी जिल्ह्यात आल्याने येथील बाजारपेठांत मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसायही तेजीत आहे. 
दरम्यान शहरवासियांपेक्षा ग्रामीण भागातून किराणा तसेच इतर साहित्याला मागणी असल्याने या व्यावसायिकांची उलाढाल वाढली आहे.