नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त सापडला?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

कणकवली - काँग्रेसनेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेश मुंबईत ता. २७ ला ऐन गणेशोत्सवात होण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी याची अधिकृत घोषणा होऊ शकते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात प्रवेशाची शक्‍यता असून राणे येत्या दोन दिवसांत दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे समजते. 

कणकवली - काँग्रेसनेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेश मुंबईत ता. २७ ला ऐन गणेशोत्सवात होण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी याची अधिकृत घोषणा होऊ शकते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात प्रवेशाची शक्‍यता असून राणे येत्या दोन दिवसांत दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे समजते. 

आगामी काळातील सर्व निवडणुका आणि २०१९ मधील लोकसभा, विधानसभा पाहता, भाजपचा ‘एकला चलो’चा नारा आहे. मिरा- भाइंदरमध्ये प्रचारात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी पुन्हा एकदा चिखलफेक सुरू केली आहे. यामुळे भाजपने आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील स्ट्राँग नेते, कार्यकर्ते आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरवात केली आहे. अशा आमदार आणि प्रमुख नेत्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अमित शहा यांच्या हस्ते मुंबईत होत आहे. याच वेळी राणेंच्या भाजप प्रवेशाची शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आजही तुलनेत अधिक आहे. नितेश राणे यांच्या रूपाने आमदार काँग्रेसचे, तेही कोकणातील एकमेव काँग्रेस आमदार आहेत; मात्र नितेश राणे आमदारकी सोडून जाणार का, याबाबत साशंकता आहे.
राणेंना गृह किंवा महसूल खात्यापैकी एक खाते मिळण्याची शक्‍यता त्यांचे समर्थक वर्तवत आहेत. त्यांचे कट्टर समर्थक आता उघडपणे ‘ते जातील तेथे आम्ही जाणार, आम्हाला पद नको,’ असे सांगत आहेत. यात जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची खरी कसरत ठरणार आहे. कारण गेल्या बारा वर्षांत जुने काँग्रेसचे लोक जे राणेंच्या सोबत राहिले, त्यांना पदे मिळाली आहेत. जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसचे २७, भाजपचे ६ सदस्य आहेत. शिवसेनेचे १६; तर राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे.

दरम्यान, जिल्ह्यातही राजकीय हालचाली सुरू आहेत. राणे दोन दिवसांत दिल्लीकडे रवाना होतील, अशी शक्‍यता आहे. थेट प्रवेश न होता, आधी अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २१) दिल्लीत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्यांच्या योजनांचा यात आढावा होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित राहणार असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही अंतिम रूप याच बैठकीत दिले जाईल, अशी शक्‍यता आहे. या निर्णयावरही राणे भाजपमध्ये गेल्यास त्यांना कधी पद मिळणार, हे ठरणार आहे.