कणकवलीत रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक

कणकवली - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा शिवसेनेने आज कणकवलीतील पटवर्धन चौकात रास्ता रोको आंदोलन केले. तत्पूर्वी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते पटवर्धन चौकापर्यंत शिवसैनिकांनी मोर्चा काढला. रास्ता रोको प्रकरणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह पन्नासहून अधिक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांची नंतर त्यांची मुक्‍तता केली.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक

कणकवली - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जिल्हा शिवसेनेने आज कणकवलीतील पटवर्धन चौकात रास्ता रोको आंदोलन केले. तत्पूर्वी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते पटवर्धन चौकापर्यंत शिवसैनिकांनी मोर्चा काढला. रास्ता रोको प्रकरणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह पन्नासहून अधिक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वांची नंतर त्यांची मुक्‍तता केली.

शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन दरम्यान ‘शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करा, संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जलद कृती दलाची एक तुकडी आणि इतर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, सहायक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्यासह महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी देखील आंदोलनस्थळी तैनात होते.

सकाळी अकरा वाजता शिवसेना कार्यालयाकडून मोर्चाला प्रारंभ झाला. आमदार श्री. नाईक यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, विधानसभा प्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख ॲड. हर्षद गावडे, राजू राठोड, जयसिंग नाईक, श्‍यामल म्हाडगूत, तेजल लिग्रस, स्नेहा तेंडुलकर, डॉ. तुळशीराम रावराणे, बाळा भिसे, शेखर राणे, सोमा घाडीगावकर, राजू राणे, बाबू आचरेकर यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

सव्वा अकराच्या सुमारास पटवर्धन चौकात शिवसेनेचा मोर्चा अडविण्यात आला. 

यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुरू केला. सुमारे पंधरा मिनिटे रास्ता रोको झाल्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आले. तेथे सर्व आंदोलकांची सशर्त जामिनावर मुक्‍तता करण्यात आली. शिवसेनेच्या आंदोलन दरम्यान महामार्ग दुतर्फा वाहनांचा मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन संपल्यानंतर जादा पोलिस बंदोबस्त तैनात करून राष्ट्रीय महामार्ग आणि आचरा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यात आली.

आंदोलन तीव्र करणार
राज्यातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केले. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी होईपर्यंत शिवसेनेचे आंदोलन सुरूच राहणार आहे. येत्या आठवड्यात आम्ही आणखी तीव्र आंदोलन करणार आहोत. आंबा, काजू आणि भात पिकाला हमी भाव मिळावा, अशीही आमची मागणी आहे. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळायला हवी. याबाबत सर्व शेतकऱ्यांच्या सह्यांची निवेदने आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार आहोत, असे आमदार वैभव नाईक या वेळी म्हणाले.