डामरे उपसरपंचांच्या घरावर हल्ला

डामरे उपसरपंचांच्या घरावर हल्ला

कणकवली - भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले तालुक्‍यातील डामरे गावचे उपसरपंच शैलेश कानडे यांच्या घरावर हल्ला करून दगडफेक व टेंपोची तोडफोड करण्यात आली. कानडे यांच्यासह पत्नी, मुलगा, आई-वडील यांना मारहाण केल्याची तक्रार येथील पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते डामरेचे सरपंच बबलू सावंत यांना पोलिसांनी आज अटक केली. हा प्रकार शुक्रवार (ता. ४) मध्यरात्री डामरे येथे घडला.

श्री. कानडे व त्यांच्या पत्नीवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकाराला आज सकाळी राजकीय रंग आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बबलू सावंत यांना शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील प्रसंग टळला. या प्रकारामुळे आज सकाळी शहरात तणावाचे वातावरण होते. शैलेश कानडे यांनी जिल्हा परिषद निवडणूक कालावधीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळेपासून कानडे आणि बबलू सावंत यांच्यात वाद होते. कानडे यांनी पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री दहा वाजता डामरे-कानडेवाडी येथील त्यांच्या घरावर दगडफेक सुरू झाली. यावेळी त्यांच्या पत्नी श्रद्धा या बाहेरील बाजूला मोबाईलवर बोलत होत्या. त्यांनी बबलू सावंत यांना पाहिले. त्यांनी आरडाओरड केली. श्री. कानडे लगेच बाहेर आले. त्यांनी त्यांचा पाठलाग करून गाडी अडवली. यावेळी माफीनामा होऊन वाद मिटवला.

यानंतर मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास बबलू सावंत तसेच १४ ते १५ जणांनी जमाव करून कानडे यांचे घर गाठले. घरात घुसून आपणाला मारहाण केली. घराबाहेरील आपल्या टेंपोची नासधूस केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सकाळी साडेनऊच्या सुमारास गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर कानडे आणि त्यांच्या पत्नीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. कानडे यांच्या पत्नी, मुलगा, आई-वडिलांना मारहाण केल्याच्या प्रकाराने काँग्रेस कार्यकर्ते भडकले. त्यांनी बबलू सावंत यांचा शोध सुरू केला. पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, बंडू ठाकुर, संतोष परब, शेखर सावंत, महेंद्र डिचवलकर, राजू पेडणेकर, अजय सावंत, संजय सावंत, अनिल खोचरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा झाले होते. बबलू सावंत यांना शोधण्यासाठी या जमावाने महामार्गावरील भाजपच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला. मात्र तेथे श्री. सावंत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ते पोलिस ठाण्यात गेले. तेथे पोलिसांनी बबलू सावंत यांना ताब्यात घेतल्याचे त्यांना कळले. त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी लावून धरली. यामुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या प्रकरणी बबलू सावंत यांना पोलिसांनी अटक करून देवगड येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.

त्यांच्यावरही कारवाई व्हावी...
बबलू सावंत हे माजी आमदार तथा सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचे खासगी सचिव आहेत. आम्ही सत्तेत असल्याने पोलिस आमचे काहीही करू शकणार नाहीत, अशी धमकी देत असून त्यांनी कानडे यांच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पोलिसांकडे केली. ते म्हणाले, ‘‘बबलू सावंत यांनी राजकीय वादातून कानडे यांना मारहाण केली असती तर मान्य होते. मात्र त्यांनी घरातील महिलांना धमकावणे, मारहाण करणे हे अशोभनीय आहे. या मारहाणीत अन्य जे पंधरा लोक आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.’’

काँग्रेस कार्यकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा
दरम्यान विरोधकांनी भाजप कार्यालयात येऊन दमदाटी केल्याची तक्रार भाजपचे समर्थ राणे यांनी पोलिसांत केली. त्यांच्या म्हणण्यानुसार आज सकाळी विरोधक सतीश सावंत, मंगेश सावंत व अजय सावंत हे भाजपच्या कार्यालयात आले. आपल्याला शिवीगाळ करून धमकी दिली. बबलू सावंत कुठे आहे असे विचारून त्यांना सोडणार नाही, असे धमकावले. त्यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com