चिंचवली स्मशानभूमी वादातून हाणामारी

चिंचवली स्मशानभूमी वादातून हाणामारी

कणकवली - खारेपाटणजवळील चिंचवली येथील स्मशानभूमी वादाला आज हिंसक वळण लागले. या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रांत नीता शिंदे यांची एक सदस्यीय समिती जबाब नोंदवत असताना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आज दोन गटांत वादावादी झाली आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात आरपीआयचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांच्यासह सात ते आठ जणांना बेदम मारहाण झाली. या प्रकरणी चिंचवली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूर्यकांत भालेकर यांच्यासह चाळीस ते पंचेचाळीस जणांवर पोलिसांनी मारहाणीबरोबरच जातिवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.

तानाजी कांबळे यांच्यासह त्यांची पत्नी आरती, मुलगा रूपेश तसेच शोभा कांबळे, सचिन पवार आणि आरपीआयचे राज्य सचिव मधुकर मोहिते यांना मारहाण झाली. या प्रकरणी सूर्यकांत भालेकर यांच्यासह स्वप्नील भालेकर, सुनील भालेकर, रवींद्र गुरव, देवेश भालेकर, अनिल पेडणेकर, सागर भालेकर, श्रीकांत भालेकर अशा ४० ते ४५ लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी ः चिंचवली गावातील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीला रस्ता नाही. हा भाग ऊस लागवड क्षेत्रात असल्याने आपल्या समाजाला वेगळ्या ठिकाणी स्मशानभूमी मिळावी, अशी मागणी येथील समाजाने ग्रामपंचायतीकडे केली होती. गेले तीन महिने वाद सुरू आहे. अखेर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू केले. तहसील कार्यालयासमोर उपोषणही केले होते. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन बाजू मांडली होती. त्यानंतर आरपीआयच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांना पत्र दिले होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी पुढील कारवाई करावी, असे कळविले होते.

यासाठी आज प्रांत श्रीमती शिंदे यांनी दोन्ही गटांची बाजू ऐकून घेण्यासाठी चिंचवली ग्रामपंचायतीमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत जबाब नोंदणी सुरू असताना तानाजी कांबळे आणि त्यांच्या पक्षाचे मुंबईहून आलेले पदाधिकारी ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांना स्थानिकांनी अडविले. आमच्या गावात तुम्ही येऊ नका, आम्ही आमचा प्रश्‍न सोडवतो असे ते त्यांना सांगत होते. यावरून दोन गटात वादावादी, खडाजंगी सुरू होती. हा प्रकार हातघाईवर आला. यात श्री. कांबळे यांच्यासह त्यांची पत्नी आरती, मुलगा रूपेश तसेच शोभा कांबळे, सचिन पवार आणि मधुकर मोहिते यांना मारहाण झाली.

घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाल्यानंतर जखमींना कणकवलीत आणण्यात आले होते. याबाबत आरपीआयचे सचिव मधुकर मोहिते यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

‘‘चिंचवली गावातील मागासवर्गीय समाजाला स्मशानभूमी नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. या अर्जानुसार आपल्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. त्यामुळे स्मशानभूमीबाबत दोन्ही समाज बाजू ऐकून घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित केली होती. सकाळी अकरा वाजता दोन्ही बाजूकडील लोकांना बोलावून जबाब नोंदणी सुरू होती. काही लोकांचे म्हणणे लेखी स्वरूपात नोंदवून घेतले होते. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आरडाओरड झाली. याची माहिती मिळाल्यानंतर आपण पोलिसांना बोलाविले होते.’’
नीता शिंदे, प्रांत, कणकवली

लाठ्या-काठ्यांनी मारहाणीचा आरोप
चिंचवली गावातील मराठा समाज आणि मागासवर्गीय समाजातील स्मशानभूमीचा वाद मिटावा, अशी आपली भूमिका होती. यासाठी ग्रामपंचायतीत दोन्ही समाजाच्या लोकांमध्ये चर्चा घडविण्यासाठी बैठक होती. चर्चेसाठी जात असताना ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर तेथील मराठा समाजातील शंभर लोकांनी आपल्यासह सोबत असलेल्यांना शिवीगाळ करून लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली, असा आरोप आरपीआयचे जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी केला.  ते म्हणाले, ‘‘बैठकीला प्रांतांनी आपल्याला पत्र देऊन बोलाविले होते. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अशा दोन गाड्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळ गेल्यानंतर आमच्यावर जमावाने हल्ला केला.’’

तानाजी कांबळेंवर चिथावणीचा आरोप
चिंचवली गावातील मागासवर्गीय समाजाला स्मशानभूमी देण्यासाठी संमत्तीपत्राने जागा निश्‍चित केली होती. हा विषय गावपातळीवर मिटणारा होता; मात्र तानाजी कांबळे यांनी मागासवर्गीय समाजाला चितावणी देऊन सामाजिक तेढ निर्माण केली. ग्रामस्थांना शिवीगाळ केली, असा आरोप चिंचवली सरपंच अनिल पेडणेकर यांनी केला. ते म्हणाले, ‘‘कांबळे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन, उपोषण, मोर्चे असा प्रकार करून गावात तेढ निर्माण केली. याला मिलिंद कांबळे हेही जबाबदार आहेत. आतापर्यंत कोणताही वादविवाद न होता लोक एकत्र होते; मात्र गावात नाहक राजकारण आणले गेले.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com