नारायण राणे यांचा  कॉंग्रेसला रामराम 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

महाराष्ट्रात कॉंग्रेस आणखी खाली जाईल. सोलापूरचे 20 नगरसेवक, पंचायत समिती सदस्यांसह 60 टक्के कॉंग्रेस माझ्यासोबत आहे. माझा निर्णय होईल त्या वेळी किती आमदार सोबत आहेत हे दाखवीन. 
- नारायण राणे 

कणकवली -  माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज आमदारकीचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत कॉंग्रेसला रामराम केला. त्यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे यांनीही पक्ष सोडला. सिंधुदुर्गातील कॉंग्रेसची सर्व सत्तास्थाने खालसा झाल्याचा व 80 टक्के कॉंग्रेस आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. दसऱ्यापूर्वी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचे सांगतानाच, त्यापूर्वी राज्यभर दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 

जिल्हा कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या प्रदेश कॉंग्रेसच्या निर्णयानंतर 19 तारखेला राणेंनी शक्तिप्रदर्शन करत कॉंग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांवर टीका केली होती. आज पुढील निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, ""प्रदेश कॉंग्रेसने जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीचा घेतलेला निर्णय नियमबाह्य होता. आज जिल्हा कार्यकारिणीची सभा झाली. ती नियमाला धरून आहे. यात सर्व सदस्यांनी कार्यकारिणी व सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा ठराव घेतला. मीही सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा आज दुपारी अडीच वाजता पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठविला. विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा 2 वाजून 25 मिनिटांनी सभापतींकडे दिला. नीलेश राणेंनीही सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम्ही आज कॉंग्रेसमुक्त झालो. आमचा या पुढे कॉंग्रेसशी संबंध नाही.'' 

ते म्हणाले, ""पक्षप्रवेशानंतर वर्षभराने कॉंग्रेसनेते अहमद पटेल यांच्यासोबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधींची भेट झाली होती. या वेळी आठवड्यात निर्णय घेण्याची ग्वाही देण्यात आली. पटेलांनी माझे अभिनंदनही केले; पण पुढे पद दिले नाही. असे एकूण तीन वेळा बोलाविले. मुंबईत तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, संरक्षणमंत्री ए. के. अँथनी, दिग्विजयसिंह यांना मुख्यमंत्री निवडीबाबत निरीक्षक म्हणून पाठविले होते. या वेळी मला 48 आमदारांनी; अशोक चव्हाणांना 32 आमदारांनी, तर बाळासाहेब विखे-पाटील यांना चौघा आमदारांनी पाठिंबा दिला होता. तेव्हाही मला डावलण्यात आले. या वेळीसुद्धा विधान परिषदेत गेल्यानंतर प्रथेनुसार सर्वांत वरिष्ठ आमदाराला गटनेतेपद दिले जाते. मी वरिष्ठ असूनही शरद रणपिसे यांना हे पद दिले गेले. हे सर्व अशोक चव्हाणांनी माझा अपमान करण्यासाठीच केले. जनतेची कामे करायची नाहीत, सरकार अडचणीत येईल असे काही करायचे नाही, केवळ राणेंविरोधात कट करायचे त्यांचे धोरण आहे.'' 

राणे म्हणाले, ""आम्ही कॉंग्रेस सोडली आहे. चव्हाणांच्या नजरेत आता जिल्ह्यात विकास सावंत हेच कॉंग्रेसवाले उरले आहेत. ते माझे निकटवर्ती नाहीत. त्यांच्या नावे जिल्हा बॅंकेचे 18 कोटींचे कर्ज आहे. ते थकबाकीदार आहेत. अनेक अवगुण, अप्रतिष्ठा आहे. अशा माणसाला चव्हाणांनी जिल्हाध्यक्ष केले.'' 

जातानाही सुटात 
कॉंग्रेसमध्ये जाताना मी सूट घालून आलो होतो. आजही पक्ष सोडताना सूट घातला आहे, असे राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाध्यक्ष अमित शहा यांना भेटल्याचा त्यांनी पुन्हा एकदा इन्कार केला. पडवे येथे हॉस्पिटलला अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे सांगत, "लवकरच ही परवानगी मिळेल,' असे ते म्हणाले. 

बीजेपीच का? राष्ट्रवादीही आहे 
"तुम्ही भाजपमध्ये जाणार का,' या प्रश्‍नाला राणेंनी बगल दिली. "तुमच्यासोबत किती आमदार आहेत,' हा प्रश्‍नही टाळला. दसऱ्याआधी या सगळ्यांची उत्तरे देऊ, असे स्पष्ट केले. "तुमच्याकडे भाजपचाच पर्याय उरला आहे का,' या प्रश्‍नावर "राष्ट्रवादीही आहे,' असे उत्तर देत "आता मैदान खुले आहे. फुटबॉल खेळता येईल. दसऱ्याआधी काय ते सांगू,' असे त्यांनी स्पष्ट केले. 

राणे कोणाविषयी काय म्हणाले? 
कॉंग्रेस पक्ष :
बारा वर्षांपूर्वी मला कॉंग्रेस पक्षाने सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्‍वासन दिले होते; पण ते पाळले नाही. वारंवार अपमान केला. कॉंग्रेसचे दुकान आता बंद होणार आहे. 

अशोक चव्हाण : अशोक चव्हाणांनी पक्ष संपविण्यासाठी काम केले. त्यांचे सुडाचे, गटबाजीचे आणि स्वार्थाचे राजकारण आहे. त्यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची पात्रता नाही. 

"राणेंचा फुटबॉल झाला,' या राज ठाकरेंच्या टीकेवर : ज्यांचा निकाल झाला आहे आणि जे खेळू शकत नाहीत, त्यांच्याबद्दल काय उत्तर द्यायचे... माझ्या घरात आमदारांची दोन पदे आहेत. त्यांच्या पूर्ण पक्षाचा एकच आमदार आहे. 

"दलबदलू' या सुप्रिया सुळेंच्या टीकेवर : शरद पवारांनी किती पक्ष बदलले, त्यांना काय म्हणू? 

उद्धव ठाकरे : शिवसेनेत परत जाणार नाही. भाजपसमोर नाक घासून घासून उद्धव ठाकरेंना नाकच राहिलेले नाही. त्यांना कोण विचारतेय. दोन वर्षे "सरकारमधून जाऊ की नको,' यात ते अडकले आहेत. 

पृथ्वीराज चव्हाण : मुख्यमंत्री झाल्यानंतर मला भेटून "तुम्हाला पाहिजे ते खाते देतो,' असे सांगितले; पण नंतर माझे महसूल मंत्रिपद काढून उद्योगमंत्री करण्याचा उद्योग केला. पुढे त्यांनी काहीच उद्योग न केल्याने कॉंग्रेसची सत्ता गेली. 

Web Title: kankavali news narayan rane congress