आचऱ्यातील खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

कणकवली - कणकवली-आचरा मार्गावरील खड्डे येत्या आठ दिवसांत न बुजविल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच बांधकामच्या अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर पडू देणार नाही, असा इशारा आज कलमठ आणि कणकवलीतील नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी दिला. दोन तासांच्या घेराओ आंदोलनानंतर बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांनी आठ दिवसांत खड्डे बुजविण्याचे आश्‍वासन दिले. 

कणकवली - कणकवली-आचरा मार्गावरील खड्डे येत्या आठ दिवसांत न बुजविल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच बांधकामच्या अधिकाऱ्यांना कार्यालयाबाहेर पडू देणार नाही, असा इशारा आज कलमठ आणि कणकवलीतील नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी दिला. दोन तासांच्या घेराओ आंदोलनानंतर बांधकामचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांनी आठ दिवसांत खड्डे बुजविण्याचे आश्‍वासन दिले. 

आचरा रस्त्यावरील खड्डयांच्या प्रश्‍नी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, भाई परब, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. शमिता बिरमोळे, डॉ. संपदा नाटेकर, बाळू मेस्त्री, विशाल हर्णे, संदेश सावंत पटेल, शिशिर परुळेकर, मेघा शेट्टी आदींनी सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता व्हटकर यांना घेराओ घातला.

दरम्यान, लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषद बांधकामच्या शाखा अभियंत्यांना बोलावून घेतले. या वेळी अभियंता सुतार यांनी आचरा मार्ग आम्ही ताब्यातच घेतला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी व्हटकर यांना फैलावर घेतले. प्रश्‍नांची थेट उत्तरे न देता, या प्रश्‍नी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवू या, त्यात मार्ग काढला जाईल, असे ते म्हणाले; मात्र लोकप्रतिनिधींची टोलवा टोलवी नको, खड्डे केव्हा बुजविणार ते सांगा, असे ठणकावले. खड्डे बुजवता येत नसतील तर या रस्त्याचा लिलाव पुकारा, सर्व नागरिक मिळून या रस्त्याची जबाबदारी घेतील, असाही पर्याय या वेळी देण्यात आला.

कार्यकारी अभियंता व्हटकर यांनी अखेर येत्या आठ दिवसांत डांबरीकरणाने सर्व खड्डे बुजविण्याची ग्वाही दिली. तसेच आठ दिवसांत खड्डे जांभ्या दगडाने बुजविणार असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी आठ दिवसांत खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको करण्याचा, तसेच बांधकामच्या एकाही अधिकाऱ्याला कार्यालयाबाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला.

रस्त्याचे भवितव्य अधांतरी
कणकवली-कलमठ-वरवडे हा रस्ता राज्यमार्ग म्हणून ओळखला जात होता. या रस्त्यापैकी कणकवली शहर पटवर्धन चौक ते कलमठ या हद्दीतील रस्ता ग्रामीण मार्ग म्हणून रूपांतरित केला, परंतु पर्यायी आचरा रस्ता पूर्ण होत नाही, तोवर हा रस्ता स्वीकारण्यास जिल्हा परिषदेने नकार दिला. त्यामुळे हा रस्ता आता सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत यापैकी कुणाच्याच ताब्यात नाही. पर्यायी आचरा रस्ता होईपर्यंत या रस्त्याचे भवितव्य अधांतरीच राहणार असल्याचे आजच्या चर्चेतून स्पष्ट झाले.