विश्‍वासूंनाच उमेदवारी देण्याची पक्षश्रेष्ठींकडून तयारी

- तुषार सावंत
शनिवार, 28 जानेवारी 2017

काँग्रेसची रणनीती - इच्‍छुकांचा प्रचार सुरू; बंडखोरी टाळण्याचे प्रयत्‍न; आघाडीसाठी प्रयत्‍न सुरू
जिल्ह्यात आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात काय सुरू आहे हे जाणून घेणारी वृत्तमालिका आजपासून देत आहोत...

काँग्रेसची रणनीती - इच्‍छुकांचा प्रचार सुरू; बंडखोरी टाळण्याचे प्रयत्‍न; आघाडीसाठी प्रयत्‍न सुरू
जिल्ह्यात आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या गोटात काय सुरू आहे हे जाणून घेणारी वृत्तमालिका आजपासून देत आहोत...

कणकवली - काँग्रेसकडे उमेदवारांची भाऊगर्दी असली तरी कार्यकर्ते इतर पक्षांत जात असल्याने काही प्रमाणात राजकीय संभ्रमावस्था आहे. मात्र यामुळे पक्षश्रेष्ठींकडून विश्‍वासातल्या लोकांनाच उमेदवारी दिली जाण्याची चिन्हे आहेत. हमखास उमेदवारी मिळणाऱ्या इच्छुकांनी आतापासूनच प्रचार सुरू केला आहे. सत्ताधारी असल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल बऱ्यापैकी टिकून आहे.

युती आणि आघाडीबाबत चर्चेची गुऱ्हाळे अजूनही सुरू असली तरी हमखास उमेदवारी मिळणार अशांनी आपल्या मतदार संघात प्रचाराला सुरुवात केली आहे. या खेपेस काँग्रेसतर्फे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. युती झाली किंवा नाही झाली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी मात्र निश्‍चित होईल, असे चित्र आहे. यातच काही कार्यकर्ते शिवसेना आणि भाजपचा पर्याय निवडताना दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणून काही भागांत राजकीय संभ्रमावस्था आहे. असे असले तरी सत्ताधारी असल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल टिकून असल्याचे चित्र आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून सुरवात होत आहे. तरीही एकाही पक्षाची अधिकृत उमेदवार यादी जाहीर झाली नाही किंवा अपक्ष उमेदवार कोण असतील, असेही चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. 

मागील जिल्हा परिषदेला काँग्रेसमध्ये जुने-नवे असा मोठा वाद होता. आता दहा वर्षांनंतर हा वाद कमी झाला असून कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले असले तरी काँग्रेसमधील गटा-तटांचे राजकारण मात्र संपलेले नाही.

कणकवली विधानसभा मतदार संघात एक जिल्हा परिषद मतदार संघ कमी झाला असून वैभववाडी-वाभवे हे गावही नगरपंचायतीमुळे कमी झाले आहे.

त्यामुळे उर्वरित १८ जिल्हा परिषद मतदार संघांत आपल्या मर्जीतील उमेदवार असावा, असे काँग्रेस नेत्यांना वाटू लागले आहे. उमेदवारी देत असताना भविष्यात तो आपल्यापासून दुरावणार नाही याची काळजी घेऊन विश्‍वासातील माणसे निवडण्यावर काँग्रेसचा भर आहे. कणकवली विधानसभा मतदार संघात १८, कुडाळ विधानसभा मतदार संघात १६ तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघात १६ जिल्हा परिषद मतदार संघ आहेत. कणकवलीत काँग्रेस तर उर्वरित दोन ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे सावंतवाडी आणि कुडाळ या दोन्ही मतदार संघांतील ३२ जागा अधिकाधिक निवडून आणण्यावर काँग्रेसने भर दिला आहे. काँग्रेसचे ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ असले तरी गेल्या काही दिवसांत पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते इतर पक्षांत गेले आहेत. कार्यकर्त्यांसोबत मोठा लवाजमाही काँग्रेस सोडून गेल्याने या खेपेस सत्तेसाठीची मॅजिक फिगर गाठणे काँग्रेसला तितकेसे सोपे नाही. त्यातच सर्व पंचायत समित्या मिळविणे असे ध्येय असले तरी आरक्षणामुळे सक्षम उमेदवार देणे ही डोकेदुखी आहे. काँग्रेसकडे काही मतदार संघांमध्ये एका जागेसाठी ४ ते ८ जण इच्छुक आहेत तर काही ठिकाणी एकच उमेदवार आहे.