कॉंग्रेसने सिंधुदुर्गची वाट लावली 

कॉंग्रेसने सिंधुदुर्गची वाट लावली 

कणकवली - सिंधुदुर्गातील कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यांचीच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासाचीही वाट लावली. निव्वळ पैसे खाण्यासाठीच रस्ते तयार केले. एवढी वर्षे ही मंडळी सत्तेवर राहिली; पण विकासाचा एक प्रकल्प त्यांना आणता आला नाही, की कोकणात समृद्धी आणता आली नाही. आता परिस्थिती बदलली आहे. अनेक विकासकामे सुरू झाली आहेत. केंद्र, राज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतही भाजपचे सरकार येईल आणि कोकणच्या विकासाला आणखी गती मिळेल, अशी ग्वाही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिली. 

येथील भगवती मंगल कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळावा झाला. यात राज्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी वैभववाडीतील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सीमा नानिवडेकर यांच्यासह अतुल रावराणे आणि दीपक सांडव यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश पारकर, प्रज्ञा ढवण, दीपक सांडव, भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र शेटये, भाजप महिला आघाडीच्या राजश्री धुमाळे, गीतांजली कामत, एस. टी. सावंत, हरेश पाटील, राजू राऊळ, प्रभाकर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. 

श्री.चव्हाण म्हणाले, ""कॉंग्रेस सरकारमुळे सिंधुदुर्ग, कोकणसह संपूर्ण देशाचा विकास खुंटला. विकासकामांबाबत आम्ही सातत्याने विधिमंडळात प्रश्न मांडले. त्यावेळी कॉंग्रेस सत्ताधाऱ्यांकडून निधीच नाही असे उत्तर यायचे. या उलट केंद्रात- राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर लगेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न मार्गी लागला. सागरी मार्ग देखील दुपदरीकरण होतोय. सिंचन प्रकल्पांसाठी निधी देण्यात आलाय. एवढेच नव्हे तर ग्रामीण आणि प्रमुख जिल्हा मार्गांसाठी हजारो कोटींच्या निधीची तरतूद झालीय.'' 

भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्गात भाजप क्रमांक 1 चा पक्ष बनवा, असे आवाहन केले. येत्या 19 फेब्रुवारीला प्रत्येक बूथवर शिवजयंती आणि 6 एप्रिल रोजी भाजप पक्षस्थापना दिवस जल्लोषात साजरा करा, असे आवाहन केले. 

संदेश पारकर यांनी कॉंग्रेसमुक्त भारतप्रमाणे कॉंग्रेसमुक्त सिंधुदुर्ग करा, असे आवाहन केले. सीमा नानिवडेकर यांनी आपली कॉंग्रेसमध्ये घुसमट होत असल्याचे मनोगत मांडले. अतुल रावराणे यांनी शतप्रतिशत भाजप हाच ध्यास असल्याचे स्पष्ट केले. अतुल काळसेकर म्हणाले, ""पवारांची राष्ट्रवादी तर ठाकरेंची शिवसेना आहे; पण भाजप हा कुण्या एका नेत्याचा पक्ष नाही तर सर्वसामान्यांचा पक्ष आहे.'' राजन तेली यांनी भाजपची निशाणी वाडीवाडीत, घराघरांत नेण्याचे आवाहन केले. जयदेव कदम, भाई परब, प्रज्ञा ढवण, दीपक सांडव, संतोष किंजवडेकर यांनीही आपले मनोगत मांडले. सूत्रसंचालन प्रमोद रावराणे यांनी केले. 

मेळाव्यात वैभववाडीचे अतुल रावराणे आणि मालवण तालुक्‍यातील दीपक सांडव यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने राज्यमंत्री चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी श्री. रावराणे, श्री. सांडव यांच्यासह सीमा नानिवडेकर, बंडू मुंडले, संदीप चव्हाण, अण्णा मुरकर, दीपक पांचाळ, प्रसाद जावडेकर, महेश रावराणे, संतोष बोडके, नलिनी पांचाळ, अरुण मेस्त्री, रणजित पाताडे, अभिकांत रावराणे, स्नेहलता रावराणे, सदानंद सावंत, शब्बीर नाईक आदी प्रमुख प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचा सत्कार झाला. 

50 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांचा शिक्षण खर्च राज्य शासन करणार 
ज्या पालकांचे उत्पन्न 50 हजार वा त्यापेक्षा कमी आहे, त्यांच्या पाल्यांचा पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे. तशी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयार करीत आहेत. ही योजना मार्गी लागताच फीसाठी पैसे नाहीत म्हणून कुणाचे इंजिनिअर, डॉक्‍टर आदी शिक्षण थांबणार नाही, अशी ग्वाही राज्यमंत्री श्री. चव्हाण यांनी दिली. 

भाषणे ठोकून विकास होत नाही - चव्हाण 
अनेक वर्षे राज्यात सत्तेत असलेल्या नेत्यांनी विधिमंडळात निव्वळ भाषणे ठोकण्याचे काम केले, तर काहींनी मालवणीमध्ये भाषण करून करमणूक केली. दिल्ली आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाभोवती इथले नेते घुटमळत राहिल्याने सिंधुदुर्गचा विकास ठप्पच राहिला. त्यावेळी विरोधी बाकावर असतानाही तत्कालीन आमदार प्रमोद जठार यांनी आवाज उठविल्याने आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळाली. खारेपाटण बस स्थानक व इतर प्रश्नांना चालना मिळाली, असेही श्री. चव्हाण म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com