संकुलांच्या सांडपाण्यामुळे कणकवलीत विहिरी दूषित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

कणकवली - शहरातील सर्वच प्रभागांतील मोठमोठ्या संकुलांच्या सांडपाण्यामुळे शहरातील विहिरी दूषित होत आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊनही नगरपंचायत प्रशासन कोणतीच कार्यवाही करीत नाही. सांडपाणी निचरा न करणाऱ्या संकुलांवर कारवाई व्हायलाच हवी, अन्यथा शहरातील सर्वच विहिरी दूषित होतील, असा इशारा नगरसेवकांनी आज प्रशासनाला दिला. 

कणकवली - शहरातील सर्वच प्रभागांतील मोठमोठ्या संकुलांच्या सांडपाण्यामुळे शहरातील विहिरी दूषित होत आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊनही नगरपंचायत प्रशासन कोणतीच कार्यवाही करीत नाही. सांडपाणी निचरा न करणाऱ्या संकुलांवर कारवाई व्हायलाच हवी, अन्यथा शहरातील सर्वच विहिरी दूषित होतील, असा इशारा नगरसेवकांनी आज प्रशासनाला दिला. 

शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीची विशेष सर्वसाधारण सभा नगरपंचायत सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधुरी गायकवाड होत्या. उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह खातेप्रमुख व इतर नगरसेवक उपस्थित होते. 

शहराच्या विविध भागांत मोठमोठी कॉम्प्लेक्‍स उभी होत आहेत; परंतु या कॉम्प्लेक्‍समधील सांडपाण्याचे कुठलेही नियोजन केले जात नाही. हे पाणी थेट गटारात किंवा मोकळ्या ठिकाणी सोडून दिले जाते. अनेक वर्षे साचलेल्या या सांडपाण्यामुळे शहरातील विहिरी दूषित होऊ लागल्या आहेत. याबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी असूनही प्रशासन काहीच कारवाई करीत नाही, असा प्रश्‍न समीर नलावडे यांनी मांडला. विरोधी पक्षनेत्या राजश्री धुमाळे यांच्यासह बंडू हर्णे, किशोर राणे, अभिजित मुसळे, रूपेश नार्वेकर यांनीही सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्या संकुलांना नोटिसा पाठवा, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. उपनगराध्यक्ष पारकर यांनीही प्रशासनाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्‍त केली. नागरिकांच्या तक्रारी असतानाही संकुलांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. 

मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांडपाणी प्रश्‍नाबाबत आपली भूमिका मांडली. शहरात गेल्या दहा वर्षांपासून अनेक संकुले उभी राहिली आहेत. या संकुलांमधून निघणारे सांडपाणी ज्या शोषखड्ड्यात सोडले जाते, त्या शोषखड्ड्यांची पाणी धारण करण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे जिथे सखल भाग असेल तिथे सांडपाणी वाहून जात आहे. सांडपाणी सोडणाऱ्या संकुलांवर कारवाई करून हा प्रश्‍न सुटणार नाही. तर कणकवली शहराला भुयारी गटार योजनेची गरज आहे. भुयारी गटार योजना कार्यान्वित झाली तरच शहराचा सांडपाणी प्रश्‍न मार्गी लागेल, असे श्री. तावडे म्हणाले. 

कणकवली शहरातून येणारे सांडपाणी सार्वजनिक स्मशानभूमीकडील नाल्यातून गडनदीपात्रात जाऊन मिळते. स्मशानभूमीलगतच्या नदीपात्रात विधी करण्यासाठी शहरवासीय येतात. त्यामुळे शहरातून येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात यावी. त्यानंतर शुद्ध पाणी नदीपात्रात सोडले जावे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या धुमाळे यांनी केली. समीर नलावडे, बंडू हर्णे, किशोर राणे, अभिजित मुसळे यांनीही या मागणीला समर्थन दिले. या प्रश्‍नावरील चर्चेला उत्तर देताना उपनगराध्यक्ष पारकर यांनी जागा उपलब्ध होत नसल्याने फिल्टर प्लॅंट बसवता येत नसल्याची माहिती दिली. मात्र स्मशानभूमी परिसरात किमान अर्धा गुंठा जागा उपलब्ध झाली तरी तेथे सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा उभी करता येणे शक्‍य आहे. त्यामुळे नगरसेवकांनीच अर्धा गुंठा जागा उपलब्ध करून द्यावी. तेथे शुद्धीकरण यंत्रणा निश्‍चितपणे बसविली जाईल, असेही श्री.पारकर म्हणाले. आजच्या सभेत शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. तसेच डांबरीकरण व इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. 

भुयारी गटारासाठी 50 कोटींची गरज 
कणकवलीच्या भुयारी गटार योजनेसाठी 50 कोटींचा निधी लागणार आहे. तेवढी क्षमता नगरपंचायतीची नाही. तसेच केंद्र व राज्याकडूनही भूमिगत गटार योजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे नगरपंचायतीनेच या सांडपाणी प्रश्‍नावर तोडगा काढावा, असा सूर सर्व नगरसेवकांच्या चर्चेतून व्यक्‍त झाला.

Web Title: Kankavli wells contaminated due to sewage