कारिवडे कचरा प्रकल्प वाद पेटला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

ग्रामस्थांचे सावंतवाडीत उपोषण - फेरसर्व्हे करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्‍वासन
सावंतवाडी - प्रसंगी आणखी तीव्र आंदोलन करू; परंतु प्रदूषणकारी कचरा प्रक्रिया प्रकल्प कारिवडे येथे होऊ देणार नाही. हा प्रकल्प यशस्वी करायचाच असेल तर त्या ठिकाणी खोदण्यात येणाऱ्या खड्ड्यात आम्हाला गाडून प्रकल्प उभारावा लागेल, असा इशारा आज कारिवडे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला. कारिवडे ग्रामस्थांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला कारिवडेवासीयांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आंदोलनानंतरसुद्धा हा प्रश्‍न तापण्याची शक्‍यता आहे.

येथील पालिकेतर्फे कारिवडे येथील कचरा डेपोसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत; मात्र ही जागा भरवस्तीत आहे. यामुळे भविष्यात होणारी आरोग्याची तसेच पाण्याची समस्या लक्षात घेता त्या ठिकाणी प्रकल्प उभारण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली होती; मात्र मागणीनंतरसुद्धा हा प्रकल्प यशस्वी करणार, असा दावा नगराध्यक्षांकडून करण्यात आला होता.

काही झाले तरी कारिवडेत हा प्रकल्प यशस्वी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत आज ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले. या वेळी माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश तळवणेकर, माजी पंचायत समिती उपसभापती महेश सारंग, पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, कारिवडे सरपंच तानाजी साईल, काजल माळकर, सुकाजी साईल, शरद पार्सेकर, विठ्ठल सावंत, गणपत गोसावी, कृष्णा ठाकूर, जनार्दन रेडकर, राजाराम रेडकर, सुशील आमुणेकर, विनय सावंत, पांडुरंग कारिवडेकर, अरविंद कारिवडेकर, ज्ञानेश्‍वर कांबळे, रामा सावंत, शिवराम रेडकर, तेजस रेडकर, गोविंद जाधव, सोनू सावंत आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या वेळी प्रकल्पाच्या विरोधात उपस्थित आंदोलकांकडून घोषणा देण्यात आल्या. प्रकल्पाला विरोध आहे; त्यामुळे तो रद्द करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांकडून प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना देण्यात आले.

दरम्यान, उशिरा प्रांताधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत आम्ही वरिष्ठांना कळवू तसेच पालिका मुख्याधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष आणि कारिवडे ग्रामस्थ अशी बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर लोकांच्या मागणीचा आदर करून योग्य तो निर्णय घ्यावा; अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देऊन ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

ख्रिश्‍चन धर्मप्रांताचा आंदोलनाला पाठिंबा
आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी ख्रिश्‍चन धर्मीयांचे फादर फेलिक्‍स लोबो व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात सीबीएससी किंवा आयसीसी बोर्डची शाळा आणण्याचा मानस आहे; मात्र अशा प्रकारचा प्रदूषणकारी प्रकल्प झाल्यास त्या ठिकाणी शाळा आणणे मुश्‍कील होईल. त्यामुळे आमचा विरोध आहे, असे लोबो यांनी सांगितले.

राज्यमंत्री चव्हाण यांची मध्यस्थी
या प्रश्नावरून प्रांताधिकारी इनामदार यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्याधिकारी विजय द्वासे यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाच्यावतीने त्या जागेचा फेरसर्व्हे करण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असा निर्णय घेतला. या प्रकरणात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या बाजूने भूमिका घेऊन शिष्टाई केली.