राज्यातील ६५ चित्रकारांच्या कुंचल्यातून अवतरले कर्णेश्‍वर!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

साडवली - संगमेश्‍वर तालुक्‍यातील कसबा येथील कर्णेश्‍वर मंदिर तसेच अनेक दुर्लक्षित मंदिरांचा इतिहास महाराष्ट्रासमोर यावा, या हेतूने देवरूख डी-कॅड चित्रकला महाविद्यालयाने स्वच्छता अभियानांतर्गत याच परिसरात निसर्गचित्रण स्पर्धा घेतली. महाराष्ट्रातून आलेल्या ६५ चित्रकारांनी या परिसरावर मोहित होऊन अप्रतिम मंदिरांचे सौंदर्य कॅनव्हासवर रेखाटून स्पर्धा यशस्वी केली.

या स्पर्धेत कर्णेश्‍वर येथील प्राचीन मंदिरांचे सुंदर रेखाटन करून बी. व्ही. कॉलेज पुणेचा विद्यार्थी संदेश मोरे याने प्रथम क्रमांक पटकावला. अवधूत करजशी (कलाविश्‍व, सांगली) याने द्वितीय, अक्षय भांडारे (कृष्णा कमवाठारकर कराड) याने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिसांमध्ये अक्षय डांगे (जे. जे. मुंबई), अमोल घुगरे (सांगली), शुभम तपकिरे, हर्षवर्धन देवनाळे (कोल्हापूर), विशाल भालकर (कोल्हापूर) या विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व डी-कॅड दिनदर्शिका देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण कराडचे चित्रकार सागर बोंद्रे यांनी केले. बक्षीस वितरण प्रसंगी संस्थाध्यक्ष बाळासाहेब पित्रे, चित्रकार आसावरी संसारे, प्राचार्य रणजित मराठे, कर्णेश्‍वर सरपंच सरदेसाई, बोरसूतकर यांसह डी-कॅडचे प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
पुरातन ठेवा प्राचीन मंदिराचा इतिहास जपणे काळाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान जाहीर केले आहे. त्यादृष्टीने डी-कॅडने प्राचार्य रणजित मराठे यांच्या संकल्पनेतून कर्णेश्‍वर मंदिर परिसरातील प्राचीन मंदिरांचा ठेवा जतन व्हावा, शासनाचे लक्ष वेधावे यासाठी स्वच्छता मोहीम, निसर्गचित्रण स्पर्धा, कार्यशाळा यांचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी राज्यभरातून ६५ चित्रकार कसब्यात आले आणि प्रत्येकाने इथले प्राचीन मंदिरांचे सौंदर्य कॅनव्हासवर रेखाटले आहे. हा नवा ठेवा आता तयार झाला आहे.

Web Title: karneshwar drawing by artist