रत्नागिरी : कासवमित्रांमुळे पिले बचावली अन्‌ समुद्रातही झेपावली

गणपतीपुळेत ‌ऑलिव्ह रिडलेचा पाच वर्षांनी आढळ; १७ पिलांचा समावेश; जीवरक्षक, स्टॉलधारकांची कामगिरी
गणपतीपुळे किनारी आढळलेली कासवांची पिल्ले.
गणपतीपुळे किनारी आढळलेली कासवांची पिल्ले.Sakal

रत्नागिरी - जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्‍यावर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी दाखल होत आहेत. प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या आणि नेहमीच पर्यटकांनी गजबजलेल्या गणपतीपुळेतही किनाऱ्‍यावरील श्रींच्या मंदिरापासून काही अंतरावर फेरीवाल्यांच्या स्टॉलजवळ कासवांची पिल्ले आढळून आली. त्यांना समुद्रापर्यंतचे अंतर पार करणे अशक्य होते. यावेळी पर्यटकांची वर्दळही मोठी होती. मात्र, किनाऱ्यावरील जीवरक्षक, स्थानिक स्टॉलधारक सरसावले आणि १७ पिलांचा समुद्रात विहारण्यासाठीचा मार्ग सुकर झाला. पाच वर्षांपूर्वी याच किनाऱ्‍यावर कासवांची घरटी आढळली होती. कासव संवर्धनासाठी वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत प्रचार, प्रबोधन सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रयत्न होत आहेत. किनाऱ्यावरील गावांमध्ये कासवमित्र तयार होत आहेत.

शांत परिसर असलेल्या किनाऱ्‍यावर बहुतांशवेळा कासव अंडी घालण्यासाठी दाखल होत असतात; परंतु गणपतीपुळेतील किनाऱ्‍यावर स्टॉलधारकांच्या जवळ पर्यटकांनी गजबजलेल्या भागात एक कासव अंडी घालून गेले होते. रविवारी (ता. २४) सकाळी किनाऱ्‍यावरील प्रभाकर गावकर यांच्या स्टॉलच्या बाजूला कासवांची काही पिल्ले रांगत असल्याचे लक्षात आले. किनाऱ्‍यावर उंट, घोडे यांची रपेट कायमच सुरू असते. पर्यटकांना फिरवण्यासाठीच्या गाड्या आणि पर्यटकांचा राबता लक्षात घेता ती पिल्ले समुद्रात जाणे अशक्य होते. कासवाची पिल्ले आढळल्यानंतर किनाऱ्‍यावरील जीवरक्षक आणि स्टॉलवालधारकांनी पुढाकार घेऊन १४ पिले एका घमेल्यामध्ये गोळा करून ती समुद्रात सोडण्यात आली. या मिशनमध्ये जीवरक्षक रोहित चव्हाण, महेश देवरुखकर, उमेश महादे, विशाल निंबरे, अक्षय सुर्वे, रोहित खेडेकर, किसन जाधव यांचा समावेश होता.

त्या कासवाचे घरटे नक्की कुठे?

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी याच किनाऱ्‍यावर कासवांची घरटी होती. तेव्हाही काही पिलाचे रेस्क्यू करण्यात आले होते. दरम्यान, त्या कासवाचे घरटे नक्की कुठे आहे, हे कोणाच्याही अजून लक्षात आलेले नाही. त्यामुळे आणखीन अंडी होती किंवा नाही याबाबत कासवमित्रांना समजू शकलेले नाही. सर्वसाधारणपणे अंडी घातल्यानंतर एकवीस दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात. यावरून ते कासव एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येऊन गेले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com