खेम सावंत-भोसलेंनी राजकारणात यावे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

गोव्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसचे पुन्हा सरकार येणार आहे. तेथे विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पटत नाही. लोकांना दाखविण्यासाठी ते एकत्र असल्याचे नाटक करत आहेत.
- जितेंद्र देशप्रभू, राजे, पेडणे संस्थान

सावंतवाडी : येथील संस्थानचे राजे खेम सावंत-भोसले यांनी कॉंग्रेसच्या राजकारणात यावे आणि निवडणूक लढवावी, असे आवताण आज येथे गोव्याचे माजी आमदार आणि पेडणे संस्थानचे राजे जितेंद्र देशप्रभू यांनी आज येथे दिले.
 

येथे एका कार्यक्रमासाठी श्री. देशप्रभू आले होते. येथील पर्णकुटी विश्रामगृहावर ते काही काळ थांबले असता उपस्थित पत्रकारांना माहिती देताना श्री. देशप्रभू यांनी खेमराजेंना हे आवताण दिले. या वेळी युवा नेते संदेश पारकर, रामा सावंत आदी उपस्थित होते.
 

श्री. देशप्रभू म्हणाले, ""सावंतवाडी राजघराण्याला इतिहास आहे. शिवरामराजांनीसुद्धा आमदार म्हणून चांगले काम केले होते. आजही या राजघराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे खेम सावंतांनी राजकारणात यावे. त्यांनी तसा निर्णय घेतल्यास आम्हीसुद्धा त्या निर्णयाचे स्वागत करू. विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवावी. काही झाले तरी ते निश्‍चितच निवडून येतील.‘‘
 

ते पुढे म्हणाले, ""महाराष्ट्रात शिवसेना-भाजप सरकार अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे यापुढे कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही. आगामी काळात महाराष्ट्रात आणि गोव्यातसुद्धा कॉंग्रेसला चांगले दिवस येणार आहेत.‘‘
 

ते म्हणाले, ""येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात होते; मात्र त्यांनी जे यश कमाविले होते, ते सार्थकी लावण्यास आणि टिकविण्यास पुढची पिढी कमी पडली. त्याचा अन्य लोकांना फायदा झाला; मात्र येणाऱ्या निवडणुका कॉंग्रेसच्या माध्यमातून योग्य ती व्युहरचना आखल्यास निश्‍चितच त्याचा फायदा होणार आहे.‘‘