ट्रेलर-कार अपघात मुंबईचे तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

खोपोली - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमवारी रात्री उशिरा खंडाळ्याच्या दिशेने बोरघाट चढताना बोरघाट पोलिस चौकी ते अमृतांजन पुलादरम्यान कार व ट्रेलरचा भीषण अपघात झाला. यात ट्रेलर रस्त्यातच फिरल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांनी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहने वळवल्याने तेथेही वाहतूक कोंडी झाली. ट्रेलरमध्ये शिरलेल्या कारमधील तिन्ही जखमींना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, त्यांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.