खंडाळा घाटातील झाड नागरिकांनीच हटवले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

खोपोली - मुंबई-पुणे महामार्गावर "आयआरबी' व वाहतूक पोलिस यंत्रणा कशी बेफिकीर बनली आहे, याचा प्रत्यय पुन्हा आला. खोपोली ते खंडाळादरम्यान शिंग्रोबा मंदिराजवळील वळण रस्त्यावर मागील आठवड्यातील वादळी पावसात आडवे पडलेले झाड आठ दिवस उलटूनही या यंत्रणांनी हटविले नव्हते. अखेर सामाजिक भान ठेवत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय असलेल्या खोपोलीतील नागरिकांनी महामार्गावरील हा अडथळा दूर केला आहे.

खोपोलीतील गुरुनाथ साठेलकर व अमोल कदम यांनी हाती कुऱ्हाड घेऊन हे झाड छाटले. त्याचे तुकडे बाजूला करून महामार्ग मोकळा केला आहे. हे आडवे पडलेले झाड वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच अपघाताला आमंत्रण देणारे ठरले होते. "सकाळ'ने छायाचित्रासह बातमी देऊनही यंत्रणांचे डोळे उघडले नव्हते.